मुंबई - लोकसभा निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, प्रमुख कार्यकर्ते आणि उमेदवारांसोबत बैठक आयोजित केली होती. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. विधानसभा निवडणुकांच्या कामाला लागण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी तरुणांसह महिलांना संधी देण्याचे आदेश शरद पवारांनी दिले आहेत, अशी माहिती जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लोकसभा निवडणुकीचा आढावाही या बैठकीत घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीत किती जागा घ्यायच्या या फॉर्म्युल्यावर चर्चा करण्यात आली नाही, असे त्यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणूकीत कोण उमेदवार असतील याचाही आढावा घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत कुठलीही चर्चा झाले नाही आणि कधीही विलीनीकरण होणार नाही, असे त्यांनी सांगितले. प्रफुल्ल पटेल यांना इडीची (सक्तवसुली संचनालय) नोटीस आलेली आहे. पण सूडाचे राजकारण होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. प्रफुल्ल पटेल यांनी खूप पारदर्शीपणे काम केले आहे. त्यामुळे आम्हाला काही शंका वाटत नाही. पटेल इडीला समाधानकारक उत्तर देतील, असे जंयत पाटील म्हणाले.
ईव्हीएमबाबत आमच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शंका व्यक्त केली. आमच्या सर्व उमेदवारांनी शंका उपस्थित केल्या आहेत. पक्ष लवकरच भूमिका मांडणार असल्याचेही ते म्हणाले.