मुंबई - घरगुती गॅस आणि इंधनाच्या दरवाढीविरोधात शनिवारी (3 जुलै) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट परिसरात जोरदार आंदोलन केले. केंद्रामध्ये भाजपाचे सरकार आल्यापासून सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या वस्तूंचे भाव गगनाला भिडत आहेत. नुकताच घरामध्ये वापरला जाणारा गॅस सिलिंडरही 25 रुपयांनी महागलेला आहे. पेट्रोल 100 रुपये पार झाले आहे. यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे.
क्रॉफर्ड मार्केट परिसरात दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष विजय वाडकर यांच्या नेतृत्वाखाली गॅस आणि इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
दरवाढीचा राष्ट्रवादीकडून निषेध
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या सूचनेनुसार व विभागीय मुंबई प्रदेश अध्यक्ष मंत्री नवाब मलिक यांच्या मार्गदर्शनानुसार इंधन दरवाढ आणि गॅस दरवाढीविरोधात हे आंदोलन झाले. 'घरगुती गॅस, पेट्रोल तसेच डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस होणारी भरमसाठ वाढ याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलने करण्यात आले', असे राष्ट्रवादीचे दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष विजय वाडकर यांनी सांगितले.
घरगुती गॅसमध्ये अशी झाली दरवाढ
गॅस सिलिंडरच्या किमतीत फेब्रुवारीमध्ये तीन वेळा वाढ करण्यात आली. ४ फेब्रुवारीला २५ रुपये, १५ फेब्रुवारीला ५० आणि २५ फेब्रुवारीला पुन्हा २५ रुपयांची दरवाढ करण्यात आली. त्यानंतर १ मार्च रोजी सिलिंडर दरात पुन्हा २५ रुपयांनी वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर १ एप्रिल रोजी सिलिंडर दरात १० रुपयांनी कपात करण्यात आली. आता १ जुलैपासून पुन्हा २५ रुपयांनी दरवाढ करण्यात आली. त्यामुळे गॅस सिलिंडर महागला आहे. गुरुवारपासून गॅस सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे विनाअनुदानित गॅस सिलिंडरसाठी मुंबई आणि नवी दिल्लीत ग्राहकांना ८३४.५० रुपये मोजावे लागत आहेत.
हेही वाचा - कंगना रणौत-जावेद अख्तर वाद पुन्हा कोर्टात!