मुंबई - माझे अमली पदार्थांच्या संदर्भात काहीही घेणे देणे नाही. माझ्या घरात जे औषध मिळाले आहे, त्याचे प्रिस्क्रिप्शन माझ्याकडे आहे, तसेच ते एनसीबीला दिले आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेता अर्जुन रामपाल यांने माध्यमांशी बोलताना दिली. आज अमली पदार्थप्रकरणी अर्जुन रामपाल याची तब्बल सात तास चौकशी करण्यात आली.
बॉलिवूड अभिनेता अर्जून रामपाल चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर झाला आहे. अर्जुनचा मित्र पॉल बार्टल याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली आहे. ड्रग्जप्रकरणी एनसीबीकडून गेल्या काही महिन्यांपासून तपास सुरू आहे. याच प्रकरणात अर्जुन रामपालचे नाव पुढे आले होते. आता त्याचा मित्र आणि ऑस्ट्रेलियन नागरिक पॉल बार्टल याला अटक करण्यात आली आहे. यापूर्वी अर्जुन रामपाल याची प्रेयसी गॅबरीयल हिची सलग दोन दिवस चौकशी करण्यात आली आहे.
पॉलच्या घरी सापडले होते अमली पदार्थ -
पॉल बार्टल हा अभिनेता अर्जुन रामपालचा जवळचा मित्र आहे, असे एनसीबी अधिकाऱ्यांनी सांगितले. अमली पदार्थ तस्करी संदर्भात आतापर्यंत दोन परदेशी नागरिकांना अटक झाली आहे. पहिली अटक अर्जुनच्या प्रेयसीचा भाऊ एगिसलोस डेमेट्रिएड्सला झाली होती. आता अर्जुन रामपालचा मित्र पॉल बार्टलला अटक झाली आहे.
बुधवारी रात्री एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी पॉलच्या घरी छापा टाकला असता त्याच्या घरी काही अमली पदार्थ आढळले होते. त्यानंतर त्याला समन्स पाठवले आणि गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
अर्जुन रामपालच्या प्रेयसीच्या भावाला अटक
एनसीबीच्या टीमने अनेक फिल्मी स्टार्स, दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या घरी छापे मारले. काही दिवसांपूर्वी अभिनेता अर्जुन रामपाल यांच्या घरी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला होता. या दरम्यान झालेल्या चौकशीत या दोघांना समन्स बजावण्यात आलेले आहे. दरम्यान अभिनेता अर्जुन रामपालच्या प्रेयसीचा भाऊ अगिसियालोसला एनसीबीने काही दिवसांपूर्वी अमली पदार्थ तस्करी संदर्भात अटक केली होती. त्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ मिळाले होते. त्यानंतर अर्जुन रामपाल व त्याच्या प्रेयसीला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते.
निर्माता फिरोज नाडियादवलाच्या पत्नीला जामीन
याआधी एनसीबीने बॉलीवूड निर्माता फिरोज नाडियादवाला यांच्या घरी सुद्धा छापा मारला होता. ज्यामध्ये फिरोजची पत्नी शबाना सईदकडून दहा ग्रॅम गांजा हस्तगत करण्यात आला होता. त्यानंतर फिरोज नाडियावालाच्या पत्नीलाही अटक केली होती. न्यायालयाने तिला पंधरा हजारांचा जामीन मंजूर केला आहे. फिरोज नाडियादवाला यालासुद्धा यासंदर्भात चौकशीसाठी समन्स बजावले आहे.
अर्जुन रामपाल-गॅब्रियेलाच्या घरी नुकतेच नव्या पाहुण्याचे आगमन
अभिनेता अर्जुन रामपाल सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपासून तो गॅब्रियेला डिमेट्रीयाडीस हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. तेव्हापासून त्यांच्या नात्यासंदर्भात जोरदार चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. अशात आता अर्जुन रामपाल आणि गॅब्रियेलाच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्याची गर्लफ्रेंड गॅब्रियेलाने मुलाला जन्म दिला आहे. काही दिवसांपूर्वीच अर्जुनने गॅब्रियेलासोबतचा एक फोटो शेअर करून ते त्यांच्या बाळाच्या आगमनासाठी सज्ज असल्याचे सांगितले होते. यानंतर गॅब्रियेलाच्या बेबी शॉवरचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.