मुंबई - महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापनेपासून केंद्राच्या तपास यंत्रणांचा दबाव (Central Agencies) सरकारवर वाढू लागला. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारमध्ये जोरदार जुंपली आहे. भाजपने केलेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांनंतर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांच्या मागे लागला आहे. या भाजपच्या डावपेचांना सर्वात प्रथम मोडीत काढण्याचे काम राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केले. मलिक यांनी कोणते आरोप केले होते, याचा आढावा ....
महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर अनेक नेते केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर -
2019 मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेत, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षांची मोट बांधून महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणले. शरद पवार यांच्या पुढाकारामुळे हा चमत्कार महाराष्ट्रात घडला खरा, मात्र आघाडीतील नेत्यांना नेहमीच केंद्रीय तपास यंत्रणांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या नवाब मलिक ईडीच्या रडारवर आले आहेत.
आर्यन खान प्रकरणी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप -
एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानच्या मुलाला ड्रग्स पार्टीत अटक केली. या प्रकरणात नवाब मलिक यांनी मोठ्या प्रमाणावर संशोधन करून माहिती गोळा केली. या प्रकरणांमधील तसेच पडद्यामागील सत्य सर्वसामान्य जनतेसमोर आणण्याचा पहिला धाडसी प्रयोग नवाब मलिक यांनी केला. मलिक यांनी रोज पत्रकार परिषदा घेऊन भाजप आणि नार्कोटिक्स विभाग तसेच समीर वानखेडे यांचे खरे चेहरे लोकांसमोर उघडे पाडले. समीर वानखेडे तर अडचणीत आलेच मात्र त्याचबरोबर भाजपच्या प्रतिमेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.
देवेंद्र फडणवीस ड्रग्जच्या उद्योगांचे मास्टरमाईड -
देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्जच्या उद्योगांचे मास्टरमाईड आहेत, असा धक्कादायक आरोप नवाब मलिक यांनी केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रग्ज प्रकरणातील सहभागाचा सीबीआय आणि इतर केंद्रीय तपास संस्थांच्या माध्यमातून तपास केला जावा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली होती. तसेच फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनीच एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडेंची बदली केल्याचा आरोप मलिक यांनी केला होता.
देशात हिटलरसारखी परिस्थिती निर्माण करुन सगळे नियम, घटना बदलून स्वतःकडे सर्व अधिकार घ्यायचे आहेत का, अशी शंका निर्माण होऊ लागली, असे नवाब मलिक म्हणाले होते. भाजपला लोकशाही संपवायची आहे. परंतु जनता त्यांना लोकशाही संपवू देणार नाही, असा इशारा मलिक यांनी दिला होता.
कुख्यात गुंडांना देवेंद्र फडणवीस यांचे आश्रय -
नागपूरचा कुख्यात गुन्हेगार मुन्ना यादव याची देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सरकारच्या काळात बांधकाम कामगार मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. बांगलादेशींच्या अवैध स्थलांतरात सहभागी असलेल्या हैदर आझमची फडणवीस यांनी मौलाना आझाद वित्त महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती, असेही त्यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांच्या आश्रयाने महाराष्ट्रात बनावट नोटांचे रॅकेट -
देवेंद्र फडणवीस यांच्या आश्रयाने महाराष्ट्रात बनावट नोटांचे रॅकेट सुरू असल्याचा आरोप मलिक यांनी केला होता. 'पाच वर्षांपूर्वी 8 नोव्हेंबरला देशात नोटाबंदी झाली, देशात 2000 आणि 500 च्या बनावट नोटा पकडल्या गेल्या, मात्र महाराष्ट्रात वर्षभरात बनावट नोटांची एकही घटना घडली नाही. देवेंद्र यांच्यामुळेच बनावट नोटांचे काम सुरू होते. तसेच 8 ऑक्टोबर 2017 रोजी मुंबईतील बीकेसीत एक छापेमारी झाली. यावेळी 14 कोटी 56 लाख पकडले गेले. हे प्रकरण दाबण्यासाठी फडणवीसांनी मदत केल्याचा आरोप मलिक यांनी केला होता.