मुंबई - कोरोना लस सर्वांना मोफत मिळाली पाहिजे. त्यासाठी केंद्र सरकारचे काय धोरण आहे ते लवकर स्पष्ट झाले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच सर्वपक्षिय नेत्यांबरोबर कोरोना लसीबाबत चर्चा केली होती. त्यात त्यांनी काही आठवड्यातच कोरोना लस उपलब्ध होणार असल्याचे सांगितले होते. त्या पार्श्वभूमीवर मलिक बोलत होते.
बिहार निवडणुकीतील आश्वासनाचे काय?
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वांना मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाचे काय झाले, अशी विचारणाही राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. केंद्र आणि राज्य सरकार चर्चा करून कोरोना लसीची किंमत ठरवेल, असे पंतप्रधानानी सांगितले होते. म्हणजे केंद्र सरकारला जनतेकडून पैसे उकळायचे आहेत का, असा सवालही त्यांनी केला. कोरोना लस लवकरच उपलब्ध होणार आहे. ही बाब चांगली आहे. मात्र, ती मोफतच मिळाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
सर्वपक्षिय बैठकीत मोदी काय म्हणाले...
देशातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला संबोधित करताना त्यांनी सांगितले, की येत्या काही आठवड्यांमध्येच कोरोनाची लस उपलब्ध होऊ शकते. यासोबतच, देशात लसीकरण करताना वयोवृद्धांना प्राधान्य देण्याचा विचार सरकार करत असल्याचेही ते म्हणाले.
वैज्ञानिक दृष्टीकोन आणि एकमेकांचे सहकार्य आवश्यक...
सर्वपक्षीय बैठकीनंतर बोलताना पंतप्रधान म्हणाले, की कोरोनाच्या लढाईत आपण नक्कीच जिंकू शकतो. संपूर्ण देशाच्या लसीकरणासाठी आपल्याकडे अनुभवी नेटवर्क उपलब्ध आहे. येत्या काही आठवड्यांमध्येच ही लस उपलब्ध होईल. यावर्षीच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये देशात अत्यंत भीतीचे वातावरण होते. मात्र, आता डिसेंबरमध्ये पाहिले तर, भविष्य अत्यंत आशादायी दिसत आहे. आपला हा प्रवास नक्कीच बिकट होता. त्यामुळे यापुढेही अशाच प्रकारे सकारात्मक वाटचाल करायची असेल, तर आपल्याला वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवत एकमेकांचे सहकार्य करणे आवश्यक आहे, असेही मोदी म्हणाले.