मुंबई- रमजान ईद सोमवारी साजरा होणार आहे. ईदची सामूहिक नमाज सोशल डिस्टनसिंग पाळून अदा करू द्यावी, अशी मागणी मुस्लीम बांधवांकडून होत होती. मात्र, ईदची नमाज घरातच अदा करावी, असे आवाहन अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लागू केलेल्या टाळेबंदीत मुस्लीम बांधवानी सहकार्य करून आतापर्यंत घरातच नमाज अदा केली आहे. रमजान ईदचा सण ही मुस्लीम बांधवानी आनंदाने साजरा करावा. तसेच घरातच नमाज अदा करून कोरोनाचा संक्रमण रोखण्याच्या लढाईत सामील व्हावे असे ट्विट मलिक यांनी केले आहे.
मुफ्ती हजरत आणि उकेम इकराम यांनी ईदची नमाज घरातच अदा करण्याची पद्धत मुस्लीम समुदायाला दिली आहे. त्याचे अनुकरण मुस्लीम बांधवानी करावे, असेही मलिक यांनी म्हटले आहे.
अल्पसंख्यांक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते हाजी अराफत शेख यांनी पीपीई किट घालून मुस्लीम बांधवांना सामूहिक नमाज अदा करू द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मात्र अद्याप यावर निर्णय घेण्यात आलेला नाही.