मुंबई Navi Mumbai Metro inauguration : नवी मुंबईतील बेलापूर ते पेंधर या सुमारे 11 किलोमीटर मार्गावरील मेट्रोचं काम अखेर पूर्ण झालं आहे. गेल्या काही वर्षापासून काम पूर्ण होऊनही या मेट्रो मार्गावर सेवा सुरू करण्यात आली नव्हती अखेरीस आता या मेट्रो मार्गावर मेट्रो धावणार असल्यानं नवी मुंबईकरांना त्याचा लाभ मिळणार आहे. सिडकोच्या वतीने हे स्पष्ट करण्यात आलं आहे.
कुठे धावणार मेट्रो - नवी मुंबईतील बेलापूर ते पेंधर या 11 किलोमीटर मार्गावर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे. या मार्गावर आता मेट्रो धावणार आहे. मेट्रो सुरू करण्यासाठी सीएमआय ई एस हे प्रमाणपत्र 2021 च्या ऑक्टोबर महिन्यातच मिळालं होतं. मात्र विविध कारणांमुळे या मार्गावर आतापर्यंत मेट्रो सुरू होऊ शकली नव्हती. बेलापूर आणि सेंट्रल पार्क या रेल्वे स्थानकांमध्ये अपूर्ण राहिलेली कामंही आता पूर्ण झाली आहेत. आता 21 जून 2023 मध्ये रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी ही मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी सिडकोला प्रमाणपत्र दिलं आहे. त्यामुळे बेलापूर ते पेंधर पर्यंत मेट्रो सेवा सुरू करण्यात येणार असल्याची खात्रीशीर माहिती सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तशी तयारीही मेट्रोनं सुरू केली आहे. या संपूर्ण प्रकल्पाला तीन हजार 63 कोटी रुपये एकूण खर्च आला असून हा प्रकल्प आता महामेट्रोकडे सोपवण्यात आला आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन - पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 14 किंवा 15 तारखेला मुंबईत येणार आहेत. मुंबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाचंही उद्घाटन करण्याचा सिडको आणि महा मेट्रोचा मानस आहे. त्या दृष्टीने तयारी करण्यात येत असल्याची माहिती सिडकोनं दिली आहे.
काय असेल भाडे आणि स्थानके - नवी मुंबई मेट्रोसाठी प्रत्येक दोन किलोमीटर मागे दहा रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. दोन ते चार किलोमीटरसाठी पंधरा रुपये भाडे आणि त्यानंतर प्रति दोन किलोमीटरसाठी पाच रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. तर दहा किलोमीटरच्या पुढे चाळीस रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. बेलापूर ते पेंधर या 11 किलोमीटरसाठी चाळीस रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. या रेल्वे मार्गावर बेलापूर सेक्टर 7, बेलापूर, सायन्स पार्क, उत्सव चौक, सेक्टर 11, खारघर सेक्टर 14, खारघर, सेंट्रल पार्क, पेठ पाडा, सेक्टर 34 खारघर, पंचनाद आणि पेंधर ही स्थानके असणार आहेत.
हेही वाचा...
- Mumbai Metro Service in Monsoons: पावसाळ्यातील वाहतुकीच्या समस्येवर मुंबई मेट्रो प्रशासन देणार अतिरिक्त सेवा
- Mumbai Metro Line 3: चर्चगेट ते विधानभवनपर्यंतच्या भुयारी मेट्रो मार्गाची केली मुख्यमंत्र्यांनी पाहणी; मुंबई मेट्रो 3 धावणार डिसेंबरमध्ये
- Delhi Metro : दिल्ली मेट्रोने जिंकले मुंबई मेट्रो लाइन 3 च्या देखभालीचे कंत्राट, फ्रेंच कंपनीला टाकले मागे