मुंबई - शपथविधीबाबतचा पायंडा हा भाजपनेच पाडला आहे. आक्षेप घेणार असाल, तर लोकसभाही बरखास्त करावी लागणार असल्याचे प्रत्युत्तर नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. मलिक हे मुंबई येथे पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा - तीन चाकी सरकारचे पहिल्याच दिवशी 'असत्यमेव जयते', शेलारांचा निशाणा
मलिक म्हणाले, शपथ घेण्याच्या सुरुवातीला नेत्यांची नावे घेण्याची प्रथा ही भाजपनेच पाडलेली आहे. लोकसभा सदस्यांनी शपथ घेताना नेत्यांची नावे घेतली होती. असे असेल तर भाजपच्या सर्व खासदारांची शपथ रद्द होईल. तसेच लोकसभा बरखास्त करावी लागेल. भाजपने दुसऱ्याकडे बोट दाखवू नये, असा इशारा त्यांनी चंद्रकांत पाटील यांना दिला आहे.
मलिक म्हणाले, भाजप आपल्याकडे 119 आमदार असल्याचे सांगत आहे. मात्र, ते आमदार तरी तुमच्याकडे राहतील का? असा प्रश्न विचारत त्यांनी चंद्रकांत पाटलांना आव्हान दिले आहे. तसेच ते म्हणाले भाजपने फोडाफोडीचे राजकारण करू नये. भाजपमधील बहुसंख्य आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून गेलेले आहेत. त्यांना सत्तेचा लोभ दाखवून आकर्षित करण्यात आले होते. ते आमदार निश्चितपणे परत येतील, असा दावाही मलिक यांनी केला आहे. तसेच येत्या काळात भाजप रिकामी होणार असल्याचा इशारा मलिक यांनी यावेळी दिला आहे.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
विश्वासदर्शक ठरावापूर्वी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्याचा विधिमंडळाचा नियम आहे. मात्र, आज विश्वासदर्शक ठराव घेऊन उद्या अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात येत आहे. ही कायद्याची तसेच घटनेची पायपल्ली आहे, असा आरोप आमदार तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच शपथ घेण्यापूर्वी नेत्यांचे नाव घेणे हे विधीमंडळाच्या कायद्यात बसत नसल्याचेही पाटील म्हणाले.
विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही गुप्त मतदानाने केली जाते. मात्र, हे सरकार ही निवडणूक उघडपणे घेण्याची तयारी करत आहे. आम्ही प्रबळ विरोधी पक्ष म्हणून याचा विरोध करू. तसेच कायद्यानुसार कोणत्याही सभागृहाचा सभासद नसताना मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान होता येत नाही, असे सांगत येणाऱ्या काळात उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदावरूनही भाजप आक्रमक होणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा - आरे कारशेडच्या कामाला स्थगिती; मुख्यमंत्री ठाकरेंची मोठी घोषणा