नाशिक - मुंबई-आग्रा राेडवरील रायगड नगरजवळ जळालेल्या अवस्थेत आढळून आलेला सांगाडा बेपत्ता डाॅ. सुवर्णा वाजे यांचाच असल्याचे समोर आले आहे. कौटुंबिक वादातून डॉ. सुवर्णा वाजे ( Dr. Suvarna Vaze ) यांची पती संदीप वाजे यांनी हत्या ( Medical Officer Murder Case ) केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संदीप वाजे ( Sandeep Vaze ) याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली. तालुका पोलीस ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आणखी संशयित - पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, गेली अनेक वर्षे डॉ. सुवर्णा वाजे यांच्या घरात कौटुंबिक वाद होते. त्यामुळेच ही घटना घडली आहे. डीएनए अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी कसून तपास करण्यास सुरुवात केली होती. डाॅ. सुवर्णा वाजे यांचे पती संदीप वाजे यांची कसून चौकशी करण्यात आली. यानंतर या घटनेची उकल झाली असून मुख्य आरोपी संदीप वाजे असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच आणखीही यात संशयित आहेत. मात्र, त्यांची नावे सध्यातरी सांगता येणार नाहीत, अशी माहितीही पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण - नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे ( Medical Officer ) या 25 जानेवारी रोजी मोरवाडी रुग्णालयात कामावर गेल्या होत्या. रात्री कामावरून त्या निघाल्याही होत्या. दरम्यान, वाडीवाऱ्हे पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील रायगड नगर जवळ रस्त्याच्या कडेला चारचाकी वाहनामध्ये पूर्णत: जळालेल्या अवस्थेत सांगाडा आढळून आला होता. रात्री उशीर झाल्याने पती संदीप वाजे यांनी नातेवाइकांकडे विचारपूस केली. पण, त्या न परतल्याने त्यांनी मध्यरात्री अंबड पोलीस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. जळालेली कार ही वाजे यांचीच असल्याचे चेसीज नंबरच्या मदतीने समोर आले होते. यानंतर मिळालेल्या सांगाड्याची डीएनए चाचणी केल्यानंतर हा मृतदेह डॉ. वाजे यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी केला तांत्रिक तपास - जळालेले वाहन आढळलेल्या ठिकाणापर्यंत जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज व मोबाइलचे लोकेशन ट्रॅक केले गेले. सिडकाेतील स्टेट बँक व अन्य वेगवेगळ्या भागातील सीसीटीव्हीसह वाडीवऱ्हेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्हीचे फुटेज मिळवून डॉ. सुवर्णा यांच्या मोबाईलच्या लोकेशनचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले होते.
हेही वाचा - Manmad Trekker Death : ट्रेकिंग करताना खिळा निसटला, दोघांचा मृत्यू