मुंबई- 'या सरकारने पाच वर्ष काय केले. फक्त राष्ट्रीय सुरक्षा हाच मुद्दा या विधानसभा निवडणूकीत भाजप प्रचारात वापरत आहे. ही त्यांची नीती लोकांसमोर उघड केली जाईल. तसेच जनतेच्या महत्वाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार' असल्याची, माहिती राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापन केलेल्या मुंबई शहर आणि उपनगर जिल्हा विधानसभा निवडणूक समन्वय समितीचे मुख्य समन्वयक नरेंद्र वर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा- रंगनायक चित्रपटाच्या टीजरमध्ये राहुल गांधींचा अपमान, आडनावाचा केला आक्षेपार्ह उच्चार
मुंबईत कॉंग्रेस महाआघाडी ३६ विधानसभा जागा लढवत आहे. या विधानसभा मतदारसंघामध्ये समन्वय रहावा यासाठी राष्ट्रवादीने समन्वय समितीची स्थापना केली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात कॉंग्रेस २९ आणि राष्ट्रवादी ६ जागा व समाजवादी पार्टी १ जागा लढवत आहे. यामध्ये समन्वय रहावा यासाठीची रणनिती आखण्यात आली आहे, असेही वर्मा यांनी सांगितले.
आज विधानसभा निवडणुकीसाठी स्थापन केलेल्या मुंबई शहर उपनगर जिल्हा समन्वय समितीची बैठक आज प्रदेश कार्यालयात पार पडली. निवडणुकीला फक्त १० दिवस शिल्लक असून यामध्ये कशा पध्दतीने काम करायचे, विधानसभानिहाय काय काम करायचे? यावर सविस्तर चर्चा झाली. आज झालेली चर्चा कॉंग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांना कळवणार आहोत. त्यांच्या नेत्यांसोबत उद्याच बैठक घेणार आहोत, असेही नरेंद्र वर्मा म्हणाले. या पत्रकार परिषदेला मुंबई शहर आणि उपनगर जिल्हा विधानसभा निवडणूक समन्वय समितीचे मुख्य समन्वयक नरेंद्र वर्मा, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, प्रदेश सरचिटणीस हरिश सणस, अरविंद तिवारी आदींसह समन्वय समितीचे सदस्य उपस्थित होते.