मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार व सध्या भाजपमध्ये असलेले नरेंद्र पाटील यांनी आज मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. साताऱ्यातून शिवसेनेच्या तिकीटावर ते निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी २१ उमेदवारांची पहिली यादी आज शिवसेनेकडून जाहीर करण्यात आली. मात्र, या यादीत पालघर व सातारा लोकसभा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली नाहीत. नरेंद्र पाटील यांची भेट ही सदिच्छा भेट होती. याबाबत उलटसुलट चर्चा नको, अशी प्रतिक्रिया या भेटीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीबाबत दोन्ही पक्षांचे नेते चर्चा करून रविवारी कोल्हापूर येथे होणाऱ्या युतीच्या प्रचारसभेवेळी माझा निर्णय घेतील, असे नरेंद्र पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर स्पष्ट केले.