मुंबई - देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच रंगात आला असून दुसऱ्या टप्प्यांनंतर मुबंईत प्रचाराची राळ उडणार आहे. येत्या २६ तारखेला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत वांद्रातल्या एमटीएमआरडीए मैदानावर एकाच मंचावर येणार आहेत.
मुंबईतला प्रचार संपण्याआधी ही सभा सर्वच राजकीय पक्षांना भीमटोला असेल, असे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी सांगितले. शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले असून सभेला परवानगी मिळाली आहे. तसेच मुंबई भाजपकडून या सभेची जोरदार तयारी सुरु असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
गेल्या साडेचार वर्षात शिवसेना आणि भाजप सत्तेवर असून या वर्षात शिवसेना आणि भाजप मध्ये कलगीतुरा रंगला होता. शिवसेनेच्या सामना वृत्तपत्रातूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका अनेकदा करण्यात आली होती. आता युती झाल्यानंतर पहिल्यांदाच मोदी आणि ठाकरे एका मंचावर येत असल्याने या सभेत एकमेकांवर कशाप्रकारे स्तुती सुमने उधळण्यात येतात, याचीच चर्चा सध्या सुरू आहे.
त्याचबरोबर मुंबईत गुजराती भाषिक मतदारही मोठ्या प्रमाणात असल्याने मोदी गुजरातीमधून या मतदारांना काय संदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उत्तर मुंबईत भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्या मतदारसंघात गुजराती भाषिक मतदार मोठ्या प्रमाणात आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकर मतदारांशी गुजरातीत संवाद साधताना दिसत आहेत. मातोंडकर यांच्यावरही मोदी काय बोलतात? हेही प्रचाराच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे.