मुंबई : आपण शिवसेनेत असताना काय पोचवत होतो हे आम्हाला सांगायला लावू नका, असा थेट इशारा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. मातोश्रीवर कोणीही पुष्पगुच्छ घेऊन जात नाही. काय घेऊन जातात? हे आम्हाला शिवसेनेत असल्यापासून माहित आहे, असा टोलाही यावेळी बोलताना नारायण राणे यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेला योगदान काय? आताचे शिवसैनिक हे खरे शिवसैनिक नाहीत. उद्धव ठाकरे हे अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून आयत्या बिळावर नागोबा होते, असा टोला आहे यावेळी नारायण राणे यांनी लगावला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भारतीय जनता पक्षावर तुटून पडले आहेत. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये राज्य सरकारवर त्यांचे थेट आरोप सुरू आहेत. दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबईमधील 400 किलोमीटर पर्यंतचे रस्ते कॉंक्रिटीकरण करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषित मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप केला होता. मात्र त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत.
आदित्य ठाकरे गप्प बसले सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात पुन्हा एकदा चौकशी होणार आहे. ही चौकशी होणार आहे, समजताच पिल्लू गप्प झाले आहे, असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात सातत्याने राणे कुटुंबियांकडून आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. सुशांत सिंग राजपूत याची आत्महत्या नसून, हत्या झाली आहे. याबाबत सबळ पुरावे आपल्याकडे आहेत. यामध्ये थेट आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप अनेक वेळा नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरू होणार हे समजताच आदित्य ठाकरे गप्प बसले आहेत, असे भांडुप येथील कोकण महोत्सवात पत्रकाराची संवाद साधताना नारायण राणे म्हणाले आहेत.
संजय राऊत यांनी तोंड बंद ठेवावे संजय राऊत रोज प्रसारमाध्यमांसमोर येऊन बडबड करत आहेत. आपण तोंड उघडले तर.... असे म्हणत संजय राऊत यांनादेखील नारायण राणे यांनी इशारा दिला आहे. राऊत यांनी तोंड बंद ठेवावे. नुकतेच संजय राऊत जेलमधून बाहेर आलेले आहेत. पण पुन्हा ते जेलमध्ये जाणार असा दावाही नारायण राणे यांनी यावेळी केला. संजय राऊत यांना पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आणताना आपण पैसे खर्च केले. स्वतः उद्धव ठाकरे यांचा संजय राऊत यांना त्यावेळी विरोध होता, असे ते म्हणाले. आपण शिवसेनेत असताना कोणीही शिवसेनेत शिवसेना सोडत नव्हता. मात्र आज रोज शिवसेनेतून लोक बाहेर पडत आहेत. 40 आमदार शिवसेनेतून एकदम बाहेर पडले, याचाही पुनरुच्चार नारायण राणे यांनी केला