मुंबई - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले व नवनियुक्त कार्याध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे उद्या (ता. १२ शुक्रवार) पदभार स्वीकारणार आहेत. हा पदभार सोहळा ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात पार पडणार आहे. त्याअगोदर आज नाना पटोले यांनी मुंबईत सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांना भेट दिली.
पटोले यांनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी मंत्री वर्षा गायकवाड आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यानंतर त्यांचा ताफा माहिम दर्गा येथे पोहोचला. या ठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. माजी आमदार बाबा सिद्धीकी, आमदार जिशान सिद्दीकी यावेळी उपस्थित होते. दर्गानंतर पटोले गुरूद्वारा आणि हरी मंदिर येथे जाणार आहेत. यावेळी प्रत्येक ठिकाणी काँग्रेसकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे.
कोण आहेत नाना पटोले?
नाना पटोले हे भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले आहेत. यापूर्वी नाना पटोले हे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून भाजपचे खासदार होते. 2014 ते 2017 या कालावधीत त्यांनी भाजपच्या तिकीटावर खासदारकी भूषवली आहे.
हेही वाचा - जनताच ठाकरे सरकारचा घमंड उतरवेल - आशिष शेलार
हेही वाचा - शिक्षक आक्रमक : मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर आत्मदहन करण्याचा इशारा