मुंबई : नाना पटोले म्हणाले की, शरद पवारांच्या निर्णयाबाबत आताच काही सांगणे शक्य नाही. सध्याच्या परिस्थितीत अजित पवारांबाबत माध्यमांत ज्या काही बातम्या येत आहेत, त्यांच्या परिवारात काही विषय असतील किंवा शरद पवारांच्या प्रकृतीचा विषय असेल, हे सर्व शरद पवारांशी प्रत्यक्ष बोलल्यानंतरच सांगणे योग्य होईल, असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले. तसेच शरद पवार हे फार मोठे नेते असून त्यांच्या निर्णयाबाबत काही समजून न घेता प्रतिक्रिया देणे योग्य नाही, असेही पटोले म्हणाले.
महाविकास आघाडीवर काहीही फरक नाही: नाना पटोले पुढे म्हणाले की, आम्हाला सर्वांना वाटत होते की, शरद पवार शेवटच्या श्वासापर्यंत सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रिय राहतील. पण, त्यांनी अचानक का राजीनामा दिला? हे समजण्यापलीकडे आहे. ते नेहमी त्यांची विचारधारा घेवून लढतील असे वाटत असताना त्यांनी अचानक राजीनामा दिला आहे. पण त्यांच्या या राजीनाम्यामुळे महाविकास आघाडीवर काहीही फरक पडणार नसून राष्ट्रवादीत जे कोणी अध्यक्ष होतील त्यांच्यासोबतही आमचे संबंध आतासारखेच चांगले राहतील, असेही नाना पटोले म्हणाले.
कुठलीही राजकीय खेळी नाही: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून शरद पवारांनी आज पायउतार होण्याचे एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात जाहीर केले. त्यानंतर राष्ट्रवादी पक्षातून त्यांच्या या निर्णयाला मोठा विरोध होत असून शरद पवारांनी कुठल्याही परिस्थितीत राजीनामा देऊ नये, अशी भुमिका पक्षाच्या नेत्यांपासून कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. याच धर्तीवर महाविकास आघाडीचे घटक असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे घटक असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीवर काही परिणाम होणार नसून, शरद पवारांचा हा निर्णय कुठलीही राजकीय खेळी नसल्याचे सांगितले आहे. राष्ट्रवादी पक्षात काही अंतर्गत घडामोडी काही दिवसांपासून सुरू असून हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, असेही राऊत म्हणाले आहेत.
हेही वाचा: Sanjay Raut On Sharad Pawar Resign शरद पवारांचा निर्णय कुठलीही राजकीय खेळी नाही संजय राऊत