मुंबई - अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी या पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटण्यास जाताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना केलेल्या अटकेचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र निषेध केला आहे. उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य नसून योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली तालिबानी राज असल्याचा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केला.
मोदी सरकारमधील गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या कारने शेतक-यांना चिरडले. मंत्र्यांच्या मुलावर कारवाई करण्याऐवजी त्याला वाचवण्यासाठी योगी आदित्यनाथ यांचे सरकार आटापिटा करत आहे. तर पीडित शेतकरी कुटुंबियांना भेटून त्यांचे अश्रू पुसण्यासाठी जात असताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, खासदार दिपेंदर हुड्डा व काँग्रेस कार्यकर्ते यांच्याशी पोलिसांनी गैरवर्तन केले. तसेच त्यांना बेकायदेशीर अटक केली. उत्तर प्रदेशात लोकशाहीचा गळा घोटला जात असून शेतकरी, दलित, वंचित, अल्पसंख्यांक समाजावर अन्याय व अत्याचार केले जात आहेत, पीडित कुटुंबियांना भेटू दिले जात नसल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
प्रियंका गांधी यांना लखीमपूर खीरीला जात असताना रस्त्यावर अनेक ठिकाणी अडवण्यात आले. प्रियंका गांधी यांना भारतीय जनता पक्ष व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ का घाबरतात? पीडित कुटुंबियांना भेटणे भाजपाच्या राज्यात गुन्हा आहे का? उत्तर प्रदेशातील भाजपाच्या अत्याचारी राजवटीला तेथील जनता कंटाळली आहे. या अत्याचारी सरकारला जनता धडा शिकवेल. काँग्रेस पक्ष जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून प्रियंका गांधी यांना पीडित कुटुंबियांना भेटण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे पटोले म्हणाले.
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथील शेतकरी नरसंहाराच्या निषेधार्थ व शेतक-यांचे मारेकरी भाजप सरकारच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी राज्यभर आज आंदोलन करणार असल्याचा इशारा नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेतून दिला.
हेही वाचा - लखीमपूर खीरी हत्याकांड : पोलिसांनी ताब्यात घेताच प्रियांका गांधींचा दिसला "दुर्गावतार"
हेही वाचा - बाबू गेनूला इंग्रजांनी चिरडून मारले, तसेच लखीमपूरमध्ये भाजप सरकारचे कृत्य -संजय राऊत