मुंबई - बोरिवली विभागातील राम मंदिर सिग्नल जवळ बुधवारी रात्री एका तृतीयपंथीयांवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरातील सर्व तृतीयपंथीयांनी निर्वस्त्र होऊन रास्ता रोको करत वाहतूक काही काळ बंद केली होती. पोलिसांची मध्यस्थी आणि कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तृतीयपंथीयांनी मार्ग मोकळा केला.
तृतीयपंथीयांनी निर्वस्त्र होत केला रस्ता रोको -
मुंबईतील बोरिवली परिसरात बुधवारी रात्री राम मंदिर सिग्नल भागात अज्ञाताने एका तृतीयपंथीवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याची हत्या केली. या घटनेनंतर येथील तृतीयपंथीयांनी निर्वस्त्र होत रस्ता रोको केला. यामुळे या भागात वाहतूकीचा काही काळ खोळंबा झाला होता. या बाबतची माहिती पोलिसांना मिळताच एम.एच.बी पोलीस अधिकारी आणि डीसीपी विशाल ठाकूर यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी तेथील तृतीयपथीयांना समजावले आणि कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी हा मार्ग वाहतूकीसाठी मोकळा केला.
दोन संशयीत ताब्यात -
दरम्यान जखमी अवस्थेत त्या तृतीयपंथीयास जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यावेळी डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणांमध्ये एमएचबी पोलिसांनी दोन संशयीत व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. सध्या पोलीस त्यांची विचारपूस करत आहेत.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये अनैतिक संबंधातून तरुणाचा कोयत्याने वार करून खून