मुंबई - कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाऊन लावल्यामुळे आर्थिक मंदी सुरू झाली आहे. याचा परिणाम जागतिक दर्जाच्या मुंबई महापालिकेलाही बसला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात पालिकेच्या कर निर्धारण विभागाचे कर्मचारी गुंतल्याने पालिकेची कर वसूली झालेली नाही. तसेच कोरोनामुळे कर निर्धारण व संकलन विभागाच्या 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या सहाय्यक आयुक्त संगीता हसनाळे यांनी दिली.
मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 33 हजार कोटींचा आहे. पालिकेचा जकात कर हा मुख्य आर्थिक स्रोत होता. जकातीमधून पालिकेला वर्षाला 7 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळत होता. 2017 मध्ये जकात कर रद्द करून जीएसटी कर लागू करण्यात आला. जकात कर रद्द झाल्याने पालिकेला होणारे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारकडून दरमहा 670 कोटी रुपये दिले जात आहेत. 2022 पर्यंत ही रक्कम पालिकेला दिली जाणार आहे. त्याचवेळी राज्य सरकारने पालिकेला आपल्या उत्पन्नाचे स्रोत शोधण्यास सांगण्यात आले आहे.
कोरोनामुळे कर वसुली नाही -
राज्य सरकारकडून मिळणारा जीएसटीचा परतावा 2022 मध्ये बंद होणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने नागरिकांच्या घर आणि संपत्तीवर मालमत्ता कर वसूल करण्यास सुरुवात केली आहे. मालमत्ता करातून पालिकेला दरवर्षी 5500 कोटी रुपये इतका उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा पालिकेला होती. मात्र, पालिकेच्या अपेक्षेप्रमाणे ही वसुली झालेली नाही. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 या आर्थिक वर्षात 4159.74 करोड इतका मालमत्ता कर वसूल करण्यात आला. आमच्या कर निर्धारण विभागाचे कर्मचारी कोरोनाच्या कामात गुंतले असल्याने यावर्षी कर वसुली झाली नसल्याची माहिती संगीता हसनाळे यांनी दिली.
3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू -
22 मार्चपासून देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले. मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी काम करत आहे. कर निर्धारण व संकलन विभागाचे अधिकारीही त्यांच्यासोबत काम करत आहेत. यादरम्यान, आमच्या विभागातील 3 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, अशी माहिती संगीता हसनाळे यांनी दिली.
कोरोनामुळे जप्ती नाही -
मुंबईत साडेतीन लाखांहून अधिक मालमत्ता आहेत. यापैकी बहुतांश मालमत्ता धारक वेळोवेळी मालमत्ता कर भरतात. मात्र, मालमत्ता कर भरण्यास जे मालमत्ताधारक टाळाटाळ करतात त्यांच्यावर पालिका नियमानुसार कारवाई करण्यात येते. मालमत्ता कर थकबाकीपोटी दुचाकी, चारचाकी, घरातील फर्निचर, टिव्ही, फ्रीज आदी वस्तू पालिकेकडून जप्त केल्या जातात. परंतु यंदा कोरोनाचे संकट असल्याने सध्या कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे हसनाळे यांनी सांगितले.
कर विभागाचे उपायुक्तही क्वारंटाईन -
मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आरोग्य विभाचे उपायुक्त सुनिल धामणे यांच्या जागी रमेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सुनिल धामणे यांची कर व संकलन विभागाचे मुंबई महापालिकेच्या कर व संकलन विभागाचे उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. मात्र, कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने धामणे यांना काही दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले होते.