मुंबई - भांडूप येथील पवई परिसरात मिठी नदीवर 1940 साली बांधलेला पूल जीर्ण आणि धाेकादायक झाल्याने त्या पुलाचे बांधकाम अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आले आहे. विक्रमी वेळेत व नियोजनानुसारच पावसाळ्यापूर्वी पुलाचे बांधकाम करण्यात आले असून या पुलामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा आणखी एक मार्ग आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली.
पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा मार्ग
भांडूपच्या एस विभागांतर्गत असणा-या पवई परिसरात मिठी नदीवर साधारणपणे १९४०च्या सुमारास बांधलेला ब्रिटिशकालीन एक जुना पूल होता. हा पूल अतिधोकादायक झाल्याने डिसेंबर २०२० मध्ये तोडण्यात आला. त्यानंतर महापालिकेच्या पूल खात्याद्वारे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन केवळ ५ महिन्यांच्या अल्पावधीत पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. तब्बल ३४ मीटर लांबीचा आणि २४ मीटर रुंदी असणाऱ्या या नव्या पुलाचे बांधकाम सुरु असताना महापालिकेच्या संबंधित अधिकारी व काही कर्मचाऱ्यांना तसेच सदर ठिकाणी काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांदेखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र, या आव्हानावर यशस्वीपणे मात करुन पुलाचे बांधकाम विक्रमी वेळेत व नियोजनानुसारच पावसाळ्यापूर्वी करण्यात आले. या पुलामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा आणखी एक मार्ग आता वाहतुकीसाठी खुला झाल्याचे वेलरासू यांनी सांगितले.
मिठी नदीवर होता ब्रिटिशकालीन पूल
भांडूप फिल्टरपाडा परिसरातून जाणारा साकी विहार मार्ग आहे. या मार्गाद्वारे पश्चिम उपनगरातील आरे कॉलनी परिसरात जाता येते. याच मार्गादरम्यान असणाऱ्या मिठी नदीवर सन १९४०च्या सुमारास २० मीटर लांबी व ७ मीटर रुंदी असणारा पूल बांधण्यात आला होता. हा पूल डिसेंबर २०२०मध्ये धोकादायक म्हणून घोषित केला हाेता. त्यानंतर लगेचच हा पूल पाडण्यात आला. नव्या पुलाचे बांधकाम हे नुकतेच पूर्ण झाले असून हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे. विशेष म्हणजे जुन्या पुलाची रुंदी ही केवळ ७ मीटर इतकी होती, या तुलनेत नव्या पुलाची रुंदी ही २४ मीटर इतकी असल्याची माहिती पालिकेचे प्रमुख अभियंता (पूल) राजेंद्रकुमार तळकर यांनी दिली.