मुंबई - बृहन्मुंबई महापालिका ( Mumbai Corporation ) क्षेत्रातील हरितक्षेत्राची चांगली जपणुकीसह वाढ व्हावी तसेच मुंबईचे पर्यावरण सातत्याने समृद्ध व्हावे, यासाठी मुंबईत दोनदिवसीय विशेष कार्यशाळेचे ( Mumbai Corporation Arrange Workshop For Increase Green Area ) आयोजन करण्यात आले आहे. १४ व १५ डिसेंबरला होणाऱ्या या कार्यशाळेत देशभरातील ७५ तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. हरित क्षेत्र जपणूक व संवर्धन या विषयावर सविस्तर विचारमंथन करून भविष्यातील अंमलबजावणीची दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.
कृती आराखडा बनवण्याची गरज - ही कार्यशाळा भायखळा परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात ( Veermata Jijabai Bhosale Garden Mumbai ) आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेबाबत माहिती देताना जितेंद्र परदेशी यांनी, बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील हरित क्षेत्र वाढवणे, जैवविविधता जपणे आणि पर्यायाने पर्यावरण अधिकाधिक समृद्ध करणे यासाठी बृहन्मुंबई महापालिका ( Mumbai Corporation Arrange Workshop For Increase Green Area ) सातत्याने काम करते. याचाच भाग म्हणून वृक्ष जपणूक आणि वृक्षारोपण यासह बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणी उभी उद्याने अर्थात 'व्हर्टिकल गार्डन', उड्डाणपुलांखालील जागांचा पर्यावरण पूरक वापर आणि मियावाकी वने यासारख्या विविध उपायोजना नियमितपणे राबविल्या जात आहेत. तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेल्या मुंबईसारख्या शहरात जागेची असणारी कमतरता आहे. त्यामुळे ही कमतरता लक्षात घेऊन उपलब्ध जागेचा अधिकाधिक पर्यावरण सुसंगत विकास करण्यासाठी एक अभ्यासपूर्ण कृती आराखडा बनवण्याची गरज आहे. यासाठी हरितक्षेत्र - पर्यावरण, वनस्पती - वृक्ष आणि संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत सविस्तर विचारमंथन होणे गरजेचे आहे. हीच गरज लक्षात घेऊन या दोनदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
या संस्थांचा सहभाग - बृहन्मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाच्या ( Mumbai Municipal Corporation Garden Department ) पुढाकाराने आयोजित या कार्यशाळेमध्ये टाटा समाज विज्ञान संस्था (TISS), वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट इंडिया (WRI), युथ फॉर युनिटी अँड वॉलिंटरी अॅक्शन यांचाही सहभाग असणार आहे. या कार्यशाळेत हरितक्षेत्र व्यवस्थापन व संवर्धन समुदाय आधारित कार्यक्रम अंमलबजावणी, विविध स्तरीय उपाययोजनांसाठी आंतरविद्याशाखीय सहभाग, दीर्घकालीन परिरक्षणासाठी पर्यावरणाच्या अनुषंगाने उपजीविका विषयक बाबींविषयी उहापोह इत्यादी विविध विषयांवर सविस्तर चर्चा आणि विचारमंथन होणार असल्याचेही परदेशी यांनी सांगितले आहे.