मुंबई - शहरात पार्किंगची समस्या असल्याने पालिकेने वाहनतळे उभारली आहेत. मात्र, त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे वाहने दादर येथे पार्क करावी आणि बेस्ट बसने प्रभादेवी येथील सिद्धी विनायकाचे दर्शन घ्यावे, असा फतवा महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी काढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुंबईत वाहनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे रस्त्याच्या कडेला, रस्त्यावर कुठेही वाहने उभी केली जातात. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी पालिकेने २६ वाहनतळे सुरू केली आहेत. या वाहनतळांना प्रतिसाद मिळावा यासाठी पालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला.
सिद्धिविनायक मंदिराजवळ पार्किंगची सुविधा नसल्याने वाहतूक कोंडी होते. त्यावर उपाय म्हणून कोहिनूर स्क्वेअर येथे आपली वाहने पार्क करून बेस्टच्या बसने सिद्धिविनायक मंदिर येथे दर्शनाला जावे. त्यासाठी गडकरी चौकापासून ते सिद्धीविनायक मंदिरापर्यंत बेस्ट बसच्या नवीन व नियमित फेऱ्या असणारा मार्ग तत्काळ सुरू करण्याचे आदेश महापालिका आयु्क्तांनी बेस्ट प्रशासनाला दिले आहेत. त्यामधून पालिकेला महसूल देखील मिळणार आहे.