मुंबई - मुंबईवरील कोरोनाचे संकट काही केल्या दूर होताना दिसत नाही. अशात आता मुंबईकरांची आणि प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे. कारण आता कोरोनाच्या जोडीला पावसाळ्यात नेहमीचे आजार अर्थात डेंग्यू, मलेरिया, डायरिया, कावीळ, लेप्टो आणि त्वचेचे विकार देखील असणार आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे अत्यंत आवश्यक असते. अशावेळी हे आजार झाले तर रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन कोरोनाचा धोका वाढतो. कोरोनामध्ये इतर आजार झाला तर हे आणखी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे इतर आजारापासूनही दूर राहायचे असल्यामुळे मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा, असा सल्ला जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सपाळे यांनी दिला आहे.
पावसाळा आणि आजार हे समीकरणच मुंबईत दरवर्षी पाहायला मिळते. त्यामुळे दरवर्षी आजारांची भीती असते आणि प्रशासन त्यासाठी तयार असते. यंदा मात्र हा पावसाळा अधिक चिंतेचा आणि संकटाचा आहे. कारण कोरोनाच्या जोडीला आता पावसाळ्यातील आजारही असणार आहेत. पावसाळ्यात कोरोना कमी होईल की वाढेल हा प्रश्न सध्या प्रत्येकाच्या मनात आहे. अनेकांना वाटत होते की उन्हाने कोरोना कमी होईल पण तसे न होता उलट तो वाढला. त्यामुळे वाढेल न वाढेल याचा विचार न करता तो आपल्याला होऊ नये यासाठी सुरुवातीपासून जी काळजी घेत आहोत ती पुढे ही घ्यायची आहे हेच नागरिकांनी लक्षात घ्यावे, असेही डॉ. सपाळे म्हणाल्या.
साचलेल्या पाण्यात डास होऊन मलेरिया आणि डेंग्यू होतो. तर पावसाळ्यात पिण्याचे पाणी अशुद्ध येते, तेव्हा अशा पाण्यामुळे कावीळ आणि डायरिया होतो. त्यात ओल्या कपड्यामुळे त्वचेचे विकार होतात. त्यामुळे पावसाळ्यात विशेष काळजी घ्यावी लागते. त्यात आता कोरोना असल्याने अधिक काळजी घेणे अपरिहार्य आहे. घरात वा घराशेजारी पाणी साचणार नाही, डास होणार नाही, याकडे लक्ष द्या. पाणी उकळूनच प्या, असेही त्या म्हणाल्या.
गाफील न राहता दक्ष राहणे गरजेचे आहे. मास्क कायम वापरायचा आहे आणि फिजिकल डिस्टन्सिंग कायम पाळायचे आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची आहे आणि कोरोनासह इतर आजारांना दूर ठेवायचे आहे, असे म्हणत डॉ. सपाळे यांनी आम्ही डॉक्टर आणि प्रशासन या दुहेरी संकटाशी लढण्यासाठी तयार आहोत, असे स्पष्ट केले.