मुंबई - राज्यात कोरोना रूग्णसंख्या कमी व्हावी यासाठी कठोर नियमावली तयार करण्यात आली आहे. राज्य सरकारने गर्दी टाळण्यासाठी लॉकडाऊन घोषित केला आहे. या लॉकडाऊनची मुंबईत कठोर अंमलबजावणी होताना दिसत आहे. सार्वजनिक वाहतुकीवरही निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे यामुळे मुंबईतील रस्ते वाहतूक मंदावली आहे. मुंबईतील रस्ते आणि रेल्वे स्थानकांच्या परिसरात आज सकाळपासून शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मुंबईकर राज्य सरकारच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे. आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी याचा आढावा घेतला.
राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यामुळे सरकारसमोरील आव्हाने वाढत आहेत. वेळेवर उपचार न मिळाल्याने किंवा औषधांच्या तुटवड्यामुळे अनेकांनी आपले प्राण गमवाल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत. या सर्व बाबीबर नियंत्रण यावे यासाठी 14 एप्रिलला रात्रीच 8 वाजल्यापासून सरकारने कडक संचारबंदी लागू केली आहे. ही संचारबंदी 1 मेपर्यंत लागू राहील. परिणामी दादर, अंधेरी, वांद्रे या गजबजलेल्या परिसरांमधील रस्तेही ओस पडले आहेत. मुंबईत दररोज होणारी रस्ते वाहतूक मोठ्या प्रमाणात मंदावली आहे. पूर्व द्रुतगती मार्ग आणि पश्चिम
द्रुतगती मार्गावर वाहनांचे प्रमाण रोजच्या तुलनेत अतिशय कमी आहे. नागरिकांची गर्दी कमी झाल्यामुळे बेस्टच्या बसेसही रिकाम्या धावताना दिसत आहेत.
जास्त गर्दी झाल्यास अत्यावश्यक सेवाही बंद -
कोरोना रूग्णसंख्या कमी होण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याकडे सर्व जिल्हाधिकारी व पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. गर्दी झाल्यास अत्यावश्यक सेवाही बंद कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला दिले आहेत.