मुंबई- बेस्ट बसला होत असलेला तोटा भरुन काढण्यासाठी बेस्टने मंगळवार पासून भाडे कपात केली आहे. या निर्णयाचे सामान्य नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. मुंबईकरांसाठी सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक यंत्रणा असलेल्या बेस्ट बसच्या भाडे कपातीमुळे सामान्य मुंबईकर सुखावला आहे. भाडे कपातीबरोबरच बेस्टच्या सेवेत सुधारणा होईल, अशी आशा प्रवासी वर्गातून व्यक्त केली जात आहे.
मुंबईकर प्रवासासाठी ओला, उबेर अशा खासगी टक्सींना प्राधान्य देत होते. मात्र, आता भाडे कपातीमुळे ते पुन्हा एकदा बेस्टकडे वळतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. भाडे कपातीप्रमाणे बेस्टच्या फेऱ्या वाढल्यास प्रवासी सार्वजनिक वाहतुकीलाच पसंती देतील, असे सीएसटी ते चर्नीरोड मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्या डॉ. सतीश कुमार वासवाणी यांनी सांगितले.
बेस्टने भाडे कमी केल्याने मुजोर रिक्षा चालकांना चाप बसेल. त्यामुळे बेस्टचा हा निर्णय वेल अँड गुड आहे, असे प्रवासी माधवी घाडीगांवकर म्हणाल्या.
बेस्टने भाडे कमी केल्याचा फायदा सामान्य नागरिकांना होणार आहे. कमीत कमी भाडे 5 रुपये असणार आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.