मुंबई Industrialist Sajjan Jindal : उद्योगपती सज्जन जिंदल यांनी लग्नाचं आश्वासन देऊन अत्याचार (Sexual Assault) केल्याचा गंभीर आरोप एका महिलेनं केलाय. मुंबईत राहणारी ही ३० वर्षीय महिला आहे. उद्योगपती सज्जन जिंदल यांनी मला लग्नाचं आश्वासन दिलं होतं. मात्र, लग्न न करता त्यांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप संबंधित महिलेनं केलाय. मात्र, सज्जन जिंदल यांनी रविवारी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
काय आहे प्रकरण? : 'पीटीआय' या वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, महिलेच्या सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये तिनं अभिनेत्री असं नमूद केलंय. त्या महिलेनं दावा केलाय की ,ती काही वर्षांपूर्वी दुबई येथे एका क्रिकेट सामन्यादरम्यान सज्जन जिंदल (वय 64) यांना भेटली होती. तेव्हापासून त्यांच्यात मैत्री झाली आणि नंतर याचं रुपांतर प्रेमात झालं. तिनं पुढं असा दावा केलाय की, या वर्षी 24 जानेवारी रोजी जेएसडब्ल्यू ग्रुपच्या मुख्यालयात कथित लैंगिक अत्याचार करण्यात आला. जिंदल यांनी तिच्याशी लग्न करण्याचं आश्वासन दिल्याचंही तिनं सांगितलंय.
बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : या प्रकरणी संबंधित महिलेनं 16 फेब्रुवारी 2023 रोजी पोलिसांशी संपर्क साधला होता. मात्र, 13 डिसेंबर 2023 रोजी मुंबईच्या बीकेसी पोलीस ठाण्यात आयपीसी कलम 376, 354 आणि 506 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आलाय.
जिंदल यांनी फेटाळले आरोप : रविवारी संध्याकाळी जारी केलेल्या निवेदनात सज्जन जिंदल यांनी हे आरोप खोटे आणि निराधार असल्याचं म्हटले आहे. संपूर्ण तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तपास चालू असल्यानं आम्ही आताच या विषयावर अधिक भाष्य करणार नाही. तसेच आमच्या कुटुंबाच्या प्रायव्हसीचाही आदर करा, असंही या निवेदनात नमूद करण्यात आलंय.
महिलेचे गंभीर आरोप : सज्जन जिंदल यांना संबंधित महिला पहिल्यांदाच दुबई स्टेडियमच्या व्हीआयपी बॉक्समध्ये भेटली होती. त्यावेळी आम्ही दोघांनीही एकमेकांना फोन नंबर शेयर केले होते, असा दावा संबंधित महिलेनं केलाय. तसेच दुबई येथील भेटीनंतर जिंदल यांना मुंबई उपनगरातील वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये आणि दक्षिण मुंबईतील जिंदल मॅन्शनमध्येही मी भेटली होती. तसेच कारमध्ये जिंदल यांच्यासोबत फिरायला गेली असल्याचा दावाही त्या महिलेनं केलाय. लैंगिक अत्याचारानंतर जिंदाल तिच्याशी संपर्क करण्याचे टाळत असल्याचा दावाही तिनं एफआयएरमध्ये केलाय. ही सर्व बातमी 'पीटीआय' या वृत्तसंस्थेनं दिली आहे.
हेही वाचा -