मुंबई - 36 मतदारसंघापैकी विक्रोळी विधानसभा मतदारसंघ शिवसेना पुन्हा एकदा ताब्यात घेईल, असे बोलले जात असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडीकडून शिवसेनेचे स्थानिक आमदार सुनील राऊत यांना टक्कर देण्याची रणनिती आखली आहे. यावेळी मनसेकडून नितीन नांदगावकर किंवा जयंत दांडेकर आणि व्हीबीएकडून प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांना निवणुकीच्या मैदानात उतरवण्याची तयारी सध्या सुरू आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार धनंजय पिसाळ यांनी तर 1 महिन्याआधीच प्रचारात उडी घेतली आहे.
हेही वाचा - खूप पैसे आले म्हणजे अक्कल येत नाही, जितेंद्र आव्हाडांचा काकडेंना टोला
मनसेमधून डॅशिंग नेता अशी ओळख निर्माण केलेले नितीन नांदगावकर किंवा आपल्या उंचीची वेगळी ओळख निर्माण केलेले जयंत दांडेकर या मतदारसंघातून उभे राहतील, अशी चर्चा आहे. त्याचबरोबर आंबेडकरी बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून बहुजन आघाडीने सुद्धा महाराष्ट्र प्रवक्ते असलेले व पत्रकार राहिलेले सिद्धार्थ मोकळे यांना मैदानात उतरवण्याचे ठरवले आहे. त्यांचे नाव जवळ-जवळ निश्चित असल्याचे समजत आहे. लोकसभा निवणुकीत त्यांना चांगले मतदान झाले होते. यामुळे व्हीबीए यावेळी विजयाच्या उद्देशाने या मतदारसंघात उतरणार आहे.
हेही वाचा - 'शरद पवारांना शिवाजी महाराजांच्या नखांची तर सर आहे का'
विक्रोळी विधानसभा मतदारसंघ विक्रोळी ते नाहूरपर्यंत आहे. कामगार वस्ती म्हणून या विभागाची ओळख आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय पिसाळ यांनी तर एक महिन्याअगोदरच प्रचार सुरू केला आहे. मात्र 2014 च्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी वेगळे लढले होते. यामुळे 2014 काँग्रेसच्या तिकिटावर लढलेले संदेश म्हात्रे देखील या मतदारसंघासाठी आग्रही आहेत.
2009 साली मनसेचे मंगेश सांगळे यांनी माजी महापौर असलेले दत्ता दळवी आणि तत्कालीन खासदार असलेले संजय पाटील यांच्या पत्नी पल्लवी पाटील यांना हरवून हा मतदारसंघ ताब्यात घेतला होता. मात्र, 2014 च्या मोदी लाटेच्या जोरावर संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी मंगेश सांगळे यांना हरवून पुन्हा विक्रोळी मतदारसंघात भगवा फडकवला होता. या मतदारसंघात सेनेचे 3 भाजपचे 2, राष्ट्रवादीचा एक असे नगरसेवक आहेत.
हेही वाचा - मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंची तोफ धडाडणार
विक्रोळी मतदारसंघातील समस्या
पालिका रुग्णालय, आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव, अनेक वर्षांपासून 13 इमारतींचा रखडलेला पुनर्विकास, 44 वर्षांपासून रखडलेली दफनभूमी, डंपिंग ग्राऊंड
मतदारांची संख्या
पुरुष – १,३६,९९२
महिला – १,१७,८३८
एकूण मतदार – २,५४,८३०
विधानसभा निवडणूक २०१४ निकाल
१) सुनील राऊत, शिवसेना – ५०,३०२
२) मंगेश सांगळे, मनसे – २४,९६३
३) संजय दीना पाटील, राष्ट्रवादी – २०,२३३
४) संदेश म्हात्रे, काँग्रेस – १८,०४६
५) विवेक पंडित, रिपाइं – ६९७५
नोटा – ३२५१
मतदानाची टक्केवारी – ५१.६२ टक्के