मुंबई - लोकसभा निवडणुकीचा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सभेला फटका बसला आहे. विद्यापीठाची सिनेट सभा सोमवारी (२५) मार्च रोजी आयोजित करण्यात आली. परंतु, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने ती रद्द करावी लागली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सिनेट सभा न घेण्याची सूचना विद्यापीठाला केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करत विद्यापीठ प्रशासनाने सिनेट सभा आणि विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर करण्याची परवानगी कुलपती सी. विद्यासागर राव यांच्याकडेमागितली होती. परंतु, कुलपतींनीहीउच्च शिक्षण विभागाचा निर्णय कायम ठेवल्याने अखेर विद्यापीठाची सिनेट बैठक रद्द करण्यात आली. यात विद्यापीठ प्रशासन तोंडघशी पडले आहे.
राज्य विद्यापीठ कायद्यानुसार राज्यातील विद्यापीठाच्या सिनेट बैठकीमध्ये विद्यार्थी, प्राध्यापक आणि विविध समस्यांवर चर्चा होते. त्यानुसार प्रशासन त्यामध्ये सुधारणा करत असते. या वर्षीची पहिली सिनेट सभा २५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता दीक्षांत सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या सभेची तयारीही विद्यापीठाने केली होती.
२० मार्च रोजी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने आचारसंहितेमुळे सभा घेता येणार नसल्याचे कळवले होते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करत विद्यापीठाने विद्यापीठाचे कुलपती आणि राज्याचे राज्यपाल यांच्याकडे सभा आयोजित करण्याबाबत आणि त्यामध्ये अर्थसंकल्प सादर करण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र, कुलपतींनी परवानगी न दिल्याने ही बैठक अखेर रद्द करण्यात आल्याचे विद्यापीठाचे सदस्यांना पत्राद्वारे कळवले आहे. याविषयी सिनेट सदस्यांनीही विद्यापीठ प्रशासनावर टीका केली आहे.