मुंबई - मुंबई विद्यापीठात कुलगुरूंचे लाखो रुपयांच्या वाहन खरेदीचे प्रकरण ताजे असतानाच आता विद्यापीठाने २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांच्या दीक्षांत सोहळ्यावर तब्बल ७४ लाख २७ हजार ११६ रूपयांची उधळपट्टी केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे हा दीक्षांत सोहळा राज्यातीलच नव्हे तर देशातील सर्व विद्यापीठांमध्ये महागडा ठरला असून, याविषयी विद्यार्थी संघटनांसह सिनेट सदस्यांनीही यावर आक्षेप घेतले आहेत.
हेही वाचा - 'आधार-पॅन' जोडणीची अंतिम मुदत चुकवू नका- प्राप्तिकर विभाग
महागड्या दीक्षांत सोहळ्यात विद्यापीठाने सर्वांधिक खर्च हा कुलगुरूंच्या आग्रहाखातर आणण्यात आलेल्या नवीन ड्रेसकोडवर करण्यात आला आहे. यासोबत स्टेज सजावट, केटरिंग, ध्वनीक्षेपण व्यवस्था, पाहुण्यांच्या ग्रँड हयातमधील राहण्याची व्यवस्था, डिजीटल स्क्रीन आदींवर लाखो रुपये उधळण्यात आली आहेत. वाहतूक व्यवस्थेवर २४ हजार, संगणक व्यवस्थेसाठी १ लाख ५० हजार, डाटा कलेक्शनसाठी १ लाख १८ हजार तर केवळ पगडी साठी १ लाख ८० हजार रुपयांची उधळपट्टी केली असून, यासाठी ॲड. शोमितकुमार साळुंके यांना ही माहिती आधिकारातून माहिती मिळाली आहे.
यासंदर्भात मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. धनराज कोहचाडे म्हणाले की, हा खर्च धक्कादायक आहे. एकीकडे विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांची प्रचंड मोठी वानवा असताना अशा प्रकारे खर्च करणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन ते आटोक्यात आणण्याची कुलगुरुंची जबादारी होती, असेही डॉ. कोहचाडे म्हणाले.
रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेचे सचिन बनसोडे म्हणाले, की विद्यार्थ्यांच्या हितासाठी निधी नसल्याचे अधिकारी सांगत असतात, अशा वेळी लाखो रुपयांची उधळपट्टी का करण्यात आली, याचा जाब कुलगुरुंनी द्यावा, अशी मागणी केली आहे. तर मनविसेचे मुंबई विद्यापीठातील अध्यक्ष ॲड. संतोष धोत्रे म्हणाले, की विद्यापीठाची आर्थिक परिस्थिती नाजूक असताना कुलगुरू, प्र-कुलगुरू हे अनाठाई खर्च करत सुटले आहेत. त्यांच्या वाहनांचा विषय ताजा असतानाच आता दीक्षांत सोहळ्यात समोर आलेली माहिती पाहिली तर ही मोठी निषेधार्ह बाब आहे. आम्ही त्यांचा निश्चितच जाब विचारू, तो दिला नाही तर आंदोलन छेडू असा इशारा ॲड. धोत्रे यांनी दिला.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांनी दिली कारवाईची ग्वाही..
दीक्षांत सोहळ्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या खर्चाची माहिती घेतली जाईल, आणि त्यात काही जर वेडेवाकडे झाले असेल तर त्यावर कारवाई केली जाईल अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.