मुंबई - परीक्षा आणि त्यांचे निकाल यासाठी कायम चर्चेत असणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने आणखी एक प्रताप केला आहे. परीक्षेला हजर राहून परीक्षा दिलेल्या ९ विद्यार्थ्यांना चक्क गैरहजर दाखवून त्यांना नापास केले आहे. त्यामुळे विद्यापीठाचा हा अजब प्रकार सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारा ठरत आहे. त्यामुळे हे विद्यार्थी अडचणीत सापडले आहेत.
दरम्यान, आपल्यावर झालेल्या या प्रकारविरोधात या विद्यार्थ्यांनी आज थेट राज्यपालांकडे धाव घेतली आहे. आमच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात राज्यपालांनीच विद्यापीठाची कानउघाडणी करावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.
डिसेंबर महिन्यात विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बीएससीच्या पेपर-१ आणि पेपर-२ या विषयाच्या एटीकेटीतील केमिस्ट्री या विषयाची परीक्षा घेण्यात आली होती. त्यात भवन महाविद्यालयातील ९ विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र हे नागपाडा येथे असलेल्या महाराष्ट्र महाविद्यालयात आले होते. हे सर्व विद्यार्थी उपस्थित असताना त्यांना अनुपस्थित दाखविण्यात आल्याने ते ८ फेब्रुवारीला जाहीर झालेल्या निकालात नापास झाल्याचे समोर आले आहे. यामुळे या विद्यार्थ्यांनी विद्यापीठात चौकशी केली असता, त्यांना सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली, त्यामुळे त्यांनी आज थेट राज्यपालांकडे तक्रार दिल्यानंतर विद्यापीठ जागे झाले. आज सायंकाळी उशिरा या विद्यार्थ्यांना बोलावून त्यासाठी योग्य तो निर्णय घेतला जाईल असे सांगण्यात आल्याचे या विद्यार्थ्यांकडून संगण्यात आले.