मुंबई - परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी दिरंगाई करणारे विद्यापीठ अशी मुंबई विद्यापीठाची ओळख आहे. मात्र, आता ही ओळख पुसण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. यासाठी विद्यापीठाने ऑक्टोबर-नोव्हेंबर आणि त्यादरम्यानच्या काळात घेतलेल्या तब्बल १०७ विषयांच्या परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर केले आहेत.

शुक्रवारी विद्यापीठाकडून अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या बी.कॉमच्या पाचव्या (सीबीएसजीएस) आणि सहाव्या सेमिस्टरचा निकाल जाहीर केला. या दोन्हीही सेमिस्टरची परीक्षा ही ऑक्टोबर २०१८ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी १० हजार ४२३ विद्यार्थ्यांनी आपले नाव नोंदवले होते. तर ८ हजार ३५२ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. टीवाय. बीकॉमच्या पाचव्या सेमिस्टरचा निकाल ३५.०५ टक्के निकाल लागला. तर टीवाय.बीकॉमच्या (सीबीएसजीएस) सहाव्या सेमिस्टरचा निकालही जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा ऑक्टोबर २०१८ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी १३ हजार ४५९ विद्यार्थ्यांनी आपले नाव नोंदवले होते. त्यामधून ९ हजार ९७६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. या सहाव्या सेमिस्टरचा निकाल ४७.९३ टक्के लागल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.
४ दिवसांपूर्वीच विद्यापीठाने तृतीय वर्ष बी.कॉमचा पाचव्या सेमिस्टर परीक्षेचा निकाल जाहीर केला होता. या सेमिस्टर परीक्षेत ५७,१६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर ५६,५११ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यात ३१,९६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी ५७.११ टक्के इतकी होती. विद्यापीठाकडून आत्तापर्यंत जाहीर करण्यात आलेल्या निकालांमध्ये त्या-त्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन करण्यात आले. विद्यापीठाकडील ४ विषयाच्या सर्व उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन आणि मॉडरेशन ऑनस्क्रीन मार्किंग पद्धतीने झाले असल्याने हे निकाल लवकर लागत असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.
