मुंबई Mumbai Traffic Police News : नो पार्किंग किंवा वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांना पोलीसांच्या चौकीत नेण्यासाठी वापरण्यात येणारी टोईंग व्हॅनच चोरट्यानं पळवली. याप्रकरणी शिवडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घागरे यांनी दिली. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी तपासाची चक्रे जोरदार फिरवून चोरीला गेलेली मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाची टोईंग व्हॅन कसारा येथून ताब्यात घेतली.
ईस्टन फ्रीवर असलेल्या रॅम्प चौकी येथे वाहतूक पोलिसांची टोईंग व्हॅन उभी करून ठेवली होती. ही रस्त्यावर उभी असलेली मुंबई वाहतूक पोलिसांची टोईंग व्हॅन अज्ञात व्यक्तीने चोरून नेली. टोईंग व्हॅन घेऊन पळून जात असताना कसारा येथे अपघात झाला. अपघातामुळे त्या व्हॅनच्या चालकाला कसारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्याचा साथीदार तेथून पळून गेला आहे. अज्ञात व्यक्तीनं ही टोईंग व्हॅन चोरल्याचं समोर आल्यानंतर शिवडी पोलिसात तक्रार करण्यात आली. या प्रकरणी ईस्टन फ्री वेवरील सीसीटीव्हींच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवली आहे.
चावी वाहनाच्या डॉवरमध्ये ठेवल्यानं चोरट्याला संधी- पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई वाहतूक पोलिसांची टोइंग व्हॅन ( एमएच-१-सीपी०९०२) हमीप्रमाणे ही व्हॅन ईस्टर्न फ्रीवे, रोड राम चौकी, शिवडी येथे रस्त्याच्या कडेला उभी होती. या व्हॅनच्या चालकानं चावी व्हॅनच्या ड्रॉवरमध्ये ठेवली होती. सोमवारी सायंकाळी 6 ते 6.30 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीनं ही व्हॅन पळून नेली होती. पार्क केलेल्या ठिकाणी व्हॅन न मिळाल्यानं पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. व्हॅनचा कोणताही मागमूस न मिळाल्यानं शिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
अपघात झाल्यानं आरोपीचा फसला डाव- एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले की, चोरीची टोइंग व्हॅन चालवणाऱ्या व्यक्तीचं नाव मोनू पंडित उपाध्याय आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. तर त्याचा सहकारी अपघातस्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. उपाध्याय हा मध्य प्रदेशातील देवरी येथील रहिवासी आहे. कसारा घाटात या व्हॅनला अपघात झाला असता कसारा पोलिसांनी घटनास्थळ गाठून उपाध्याय याची चौकशी केली. तेव्हा व्हॅन चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. कसारा पोलिसांनी याबाबत मुंबई पोलिसांना माहिती दिली. ही माहिती मिळताच शिवडी पोलिसांचे पथक कसारा येथे रवाना झाले. चोरीला गेलेले पोलीस वाहन, टाटा झेनॉन ट्रक ही वाहने डीसीपी वाहतूक यांनी 2017 मध्ये खरेदी केले होते. सध्या ही व्हॅन वडाळा वाहतूक विभागाच्या ताब्यात आहे.
हेही वाचा-