मुंबई - सध्या विविध प्रकल्पांचे काम महाराष्ट्रात सुरू आहे. यात बुलेट ट्रेन, मेट्रो, समृद्धी महामार्ग टप्पा दुसरा अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या कामाचा ग्राऊंड रिपोर्ट 'ईटीव्ही भारत'ने मांडला होता. आता मुंबईतून गोवा, कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी महत्वाचा प्रकल्प असलेल्या मुंबई ते गोवा महामार्गाचा ग्राऊंड रिपोर्ट 'ईटीव्ही भारत'ने केला आहे. मुंबई ते कन्याकुमारी महामार्गाअंतर्गत मुंबई ते गोवा हा महामार्ग येतो.
- महामार्ग कधी पूर्ण होणार - मुंबई - गोवा महामार्गाचे रुंदीकरण करून तो महामार्ग नव्याने करण्याची शासनाने घोषणा केली होती. या महामार्गाचे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणार होते. परंतु, या संदर्भात एक याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती. त्या याचिकेवर उत्तर देताना हा महामार्ग फेब्रुवारी 2023 पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती राज्य सरकारने न्यायालयात दिली आहे. त्यामुळे हा महामार्ग तयार होण्यासाठी अजून 1 वर्षाचा कालावधी लागणार आहे. तसेच हा प्रकल्प पुढील एका वर्षात पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात दिली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मागील मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी मुंबई ते गोवा महामार्गाचा टप्पा पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होईल असे सांगितले आहे.
- मुंबई-कन्याकुमारी महामार्गाचा एक टप्पा - मुंबई-गोवा हा अत्यंत व्यस्त असणारा महामार्ग आहे. या महामार्गावर गेल्या अनेक वर्षात शेकडो अपघात झालेले आहेत. 2023 नवीन वर्षात जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अपघात झाला होता. या अपघातात दहा जणांचा मृत्यू देखील झाला होता. त्यामुळे या महामार्गाचे काम आता सुरू आहे. मुंबई ते गोवा हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 या नावाने ओळखला जातो. हा महामार्ग मुंबईला सीमा असलेल्या नवी मुंबई येथील पनवेलला जोडला जातो. तेथून गोव्याच्या दिशेला हा महामार्ग जातो. हा महामार्ग महाराष्ट्राच्या मुंबईमधून कोकणमार्गे गोव्यात जातो. त्यानंतर गोव्यातून कर्नाटक आणि कर्नाटकातून केरळमध्ये हा महामार्ग जातो. थोडक्यात मुंबई ते कन्याकुमारी या महामार्गातील मुंबई ते गोवा हा एक टप्पा आहे.
- महामार्गाची सध्यस्थिती - 590 किलोमीटर अंतर असलेल्या मुंबई ते गोवा महामार्गाचे रुंदीकरण गेल्या दहा वर्षापासून सुरू आहे. 2011 मध्ये याच्या कामाला सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये महामार्गाच्या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम झाले होता. या महामार्गाचे काम एकूण 11 टप्प्यांमध्ये विभाजित केले आहे. आतापर्यंत 67 ते 68 टक्के पर्यंत काम पूर्ण झाले आहे .यामध्ये चार क्षेत्र आहेत. यात इंदापूर ते वडापले, परशुराम घाट ते अडवली, अडवली ते संगमेश्वर आणि सरते शेवटी संगमेश्वर ते लांजा या ठिकाणच्या मार्ग रुंदीकरणाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही.
- किती खर्च येणार - सध्या मुंबई ते गोवा महामार्गावरून प्रवास करण्यासाठी सुमारे 13 तास लागतात. मात्र, या महामार्गाचे काम म्हण्जेच रुंदीकरण, चौपदरीकरण पूर्ण झाल्यावर हे अंतर कापण्यासाठी केवळ सात ते आठ तास लागणार आहेत. त्यामुळे कमी वेळात मुंबई ते गोवा हा प्रवास यामुळे साध्य होणार आहे. या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने 430 कोटी रुपये तरतूद केली आहे.