मुंबई - चांगल्या रस्त्यांची निर्मिती, चांगले फुटपाथ बांधणे, कचरामुक्त मुंबई, रेल्वे परिसराची सुधारणा हे प्रश्न समोर उभे आहेत. या प्रश्नांचा निपटारा करून मुंबईला दर्जेदार शहर बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. गुरुवारी पहिल्यांदाच उपनगराचे पालकमंत्री म्हणून कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली. तेथे जाऊन त्यांनी उपनगरातील पायाभूत सुविधांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसह विविध अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली.
बैठकीमध्ये मुंबईच्या विकास कामाला चालना देण्याबाबत सर्व यंत्रणांशी चर्चा झाली. उपनगराची लोकसंख्या खूप जास्त आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काम करण्याची आवश्यकता आहे. काम करताना ज्युनिअर किंवा सिनिअर अशी भूमिका न घेता टीम म्हणून काम करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचे, पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
हेही वाचा - युवा सेनेच्या राहुल फरताळे यांच्यावर तलवारीने हल्ला; कारण अस्पष्ट
पर्यावरणाला नुकसान न होता चांगले काम करण्यासाठी पर्यावरण आणि गृहनिर्माण संस्था समिती नेमण्यात येणार आहे. पूर्व-पश्चिम मुंबईला जोडणाऱ्या रस्त्यांचे सुशोभीकरण आणि रुंदीकरण करण्यात येणार आहे. मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी बेस्ट आणि पालिका यांची सांगड घालून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.
मुंबई उपनगरातील रखडलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची देखील आदित्य यांनी माहिती घेतली. या बैठकीला कॅबिनेट मंत्री अनिल परब, पूर्व-पश्चिम उपनगरातील सर्व पालिका विभागांचे आयुक्त, सहआयुक्त, म्हाडा, एमएमआरडीए, मेट्रो, बेस्ट आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.