मुंबई : मुंबईतील पंतनगर पोलीस स्टेशन परिसरामध्ये एका व्यक्तीची हत्या (Man Murder in Mumbai) करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन आरोपीचा सत्र न्यायालयाने जामीन फेटाळून (Court Denied Bail To Minor Accused) लावला आहे. यावेळी न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, आरोपीला जामीन मंजूर केला (bail to minor accused) तर याचा परिणाम त्याच्या शिक्षणावर होईल. तसेच पुन्हा आरोपी इतर वाईट संगतीमध्ये जाण्याची शक्यता असल्याने जामीन अर्ज फेटाळण्यात येत आहे, असे सविस्तर ऑर्डरमध्ये म्हटले आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायाधीश कल्पना पाटील यांनी पुढे असे म्हटले की, आरोपीला जामीन मिळाल्याने त्याच्या अभ्यासात अडथळा येऊ शकतो. या संदर्भातील निरीक्षण कारागृहाने केले होते. याला न्यायालयाने मान्य करत जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
तर आरोपी गुन्हेगारांच्या संपर्कात येण्याची शक्यता - त्याला जामीन मिळाल्यास तो पुन्हा गुन्हेगारी व्यक्तींच्या संपर्कात येऊ शकतो. मुंबईच्या पंत नगर पोलिसांनी 2 मे 2021 रोजी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला दुसऱ्या आरोपीसह एका व्यक्तीवर हल्ला केल्याप्रकरणी अटक केली होती. या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यानंतर अल्पवयीन आरोपीला डोंगरी येथील बालसुधारक गृहात पाठवण्यात आले होते.
आरोपीवर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मित्रांचा प्रभाव - विशेष न्यायाधीश कल्पना पाटील यांनी परिविक्षा अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालाचा संदर्भ दिला. ज्यामध्ये असे म्हटले होते की घटनेच्या वेळी आरोपी अल्पवयीन होता. मात्र तो आता प्रौढ झाला आहे. यासोबतच तो अभ्यासातही रस दाखवत आहे. व्यावसायिक कौशल्ये शिकण्यात उत्सुक आहे. आरोपीवर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मित्रांचा प्रभाव असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
न्यायालयाने नोंदविले हेही निरीक्षण - या प्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने सांगितले की निरीक्षण गृहात असताना आरोपी स्वत:मध्ये सुधारणा करत आहे. जामिनावर सुटल्यास तो पुन्हा वाईट संगतीमध्ये सामील होऊ शकतो. जर आरोपीची जामिनावर सुटका झाली तर तो अहमदनगर जिल्ह्यात आपल्या आईसोबत राहील. तेथून त्याला खटल्यासाठी मुंबईला जाणे कठीण होऊ शकते असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आरोपींच्या अभ्यासातही अडथळा निर्माण होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच अहमदनगरहून प्रवास केल्याने त्यांना प्रत्येक तारखेला न्यायालयात हजर राहणे कठीण होणार आहे. अतिरिक्त सरकारी वकिलांनी पुराव्यांशी छेडछाड करू शकतो असा युक्तिवाद करत जामीन अर्जाला विरोध केला. मयत आणि अर्जदार दोघेही एकाच परिसरात राहत असल्याने आरोपी साक्षीदारांवर जाऊन प्रभाव टाकू शकतो.