मुंबई - मुंबईमध्ये एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे इन्फ्लुएंझा आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णसंख्या वाढू शकते या पार्श्वभूमीवर पालिका अलर्ट मोडवर काम करत आहे. पालिकेने आपल्या रुग्णालयांसह मुंबईमधील खासगी रुग्णालयात १५०० बेड्स सज्ज ठेवण्याचे निर्देश रुग्णालयांना दिले आहेत. सध्या मुंबईमध्ये चुनाभट्टी येथील सोमय्या हॉस्पिटल जवळ एक कोविड सेंटर सज्ज ठेवले आहे. वेळ पडल्यास पंधरा दिवसात बंद केलेली कोविड सेंटर पुन्हा सुरु करण्याची तयारी ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
मुंबईत कोरोनाचा प्रसार - मुंबईत तीन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. कोरोनाचा प्रसार आटोक्यात आला असतानाच पुन्हा मार्च पासून रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मुंबईत कोरोनाच्या पहिल्या लाटेत दिवसाला २८०० दुसऱ्या लाटेत दिवसाला ११ हजार तर तिसऱ्या लाटेत दिवसाला २१ हजार रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर गेले काही महिने मुंबईत ३ ते १० रुग्णांची नोंद होत होती. त्यात मार्च महिन्यापासून पुन्हा वाढ होऊ लागली आहे. काल २४ मार्च रोजी मुंबईमध्ये ८६ रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या ४५३ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्णालयांमधील ४२५० पैकी ३३ बेड्सवर रुग्ण असून २० रुग्ण ऑक्सिजनवर असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
सध्या एकच कोविड सेंटर स्टॅण्डबायवर - मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाचा प्रसार सुरू होऊन रुग्ण संख्या वाढू लागली. तसेच रुग्णांचे मृत्यू होऊ लागल्याने बीकेसी, वरळी, दहिसर, मालाड, गोरेगाव नेसको, भायखळा, सेव्हन हिल हॉस्पिटल, कांजूरमार्ग, मुलुंड, सायन चुनाभट्टी आदी १० ठिकाणी जंबो कोविड सेंटर उभारण्यात आली. त्यामध्ये १७ हजार बेड्स उपलब्ध करण्यात आले होते. कोरोना आटोक्यात आल्यावर ही कोविड सेंटर बंद करण्यात आली. त्यामधील उपकरणे पालिकेच्या रुग्णालयात देण्यात आली. उरलेली उपकरणे अंधेरी येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये ठेवण्यात आली आहेत. सध्या केवळ सायन चुनाभट्टी येथील सोमय्या कॉलेज येथील कोविड सेंटर स्टॅण्डबायवर ठेवण्यात आले आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
१५ दिवसात कोविड सेंटर सुरू करण्याची तयारी - मुंबई महापालिका रुग्णालयात सध्या ४२५० बेड्स सज्ज ठेवण्यात आली आहेत. रुग्णसंख्या वाढल्यास चुनाभट्टी येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार केले जातील. कोरोना काळात खासगी रुग्णालयांचे बेड्स पालिकेने ताब्यात घेतले होते. त्या १५० रुग्णालयात १५०० बेड्स सज्ज ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालय आणि सेव्हन हिल रुग्णालयात सध्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. रुग्णसंख्या वाढली आणि गरज पडल्यास १५ दिवसात बंद केलेली १० जंबो कोविड सेंटर पुन्हा कार्यान्वयीत केली जातील अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी दिली.
मुंबईसह राज्यात रुग्ण वाढले - मुंबईमध्ये ८६ रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णांचा आकडा ११ लाख ५६ हजार १५६ वर पोहचला आहे. मुंबईत सध्या ४५३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. ३३ रुग्ण रुग्णालयात असून २० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. तर राज्यात काल ३४३ रुग्णांची तर ३ मृत्यांची नोंद झाली आहे. राज्यात ८१ लाख ४१ हजार २० रुग्णांची तर १ लाख ४८ हजार ४३३ मृत्यांची नोंद झाली आहे. राज्यात सध्या १७६३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.