Mumbai Railway Mega block: मुंबईत आज मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, 'या' ट्रेन उशिराने धावणार - मुंबईत रेल्वेचा मेगाब्लॉक
नियमित देखभालीच्या कामासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने आज मेगाब्लॉक घोषित केला आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर तसेच हार्बर मार्गावर हा ब्लॉक आहे. यामुळे घराबाहेर पडण्याआधी नागरिकांना मुंबई रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाकडून दिलगीरी व्यक्त केली आहे.
मुंबई : मध्य रेल्वेवर माटुंगा-मुलुंड दरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गाने वळवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. तर ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटाने उशीराने धावणार आहे. ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यानंतर माटुंगा येथे अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने धावणार आहे.
ब्लॉक कालावधीत विशेष गाड्या : ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि वांद्रे, गोरेगाव दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार चालतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.३० पर्यंत ट्रान्सहार्बर, मेन लाइनवरून प्रवास करण्याची परवानगी आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल - मानखुर्द मार्गावर विशेष उपनगरीय गाड्या चालविण्यात येणार असल्याची माहिती आहे. मध्य रेल्वे, मुंबई विभाग विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी आपल्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक आहे. त्यामुळे प्रवाशांना विनंती आहे की, त्यामुळे होणाऱ्या गैरसोयीसाठी रेल्वे प्रशासनाला सामोरे जावे. हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर निघताना लोकलचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावे लागणार आहे.
हार्बर लाईनचे वेळापत्रक : वडाळा रोड-मानखुर्द अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत मेगा ब्लॉग घोषित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - वांद्रे, गोरेगाव सेवा सुर राहतील. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.०३ ते दुपारी ३.५४ वाजेपर्यंत पनवेल, बेलापूर, वाशी करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल, बेलापूर, वाशी येथून सकाळी ९.४० ते दुपारी ३.२८ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहे.