मुंबई - समाज माध्यमांवर सध्या शहरासह उपनगरात मुले पळवणारी टोळी कार्यरत असल्याच्या अफवेचे लोन पसरले आहे. त्यामुळे निष्पाप लोकांना मारहाण होऊन त्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. अशा अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
मुलांचे अपहरण झाल्याचे अनेक खोटे तथ्यहीन मॅसेज सध्या समाजमाध्यमांवर फिरत आहेत. त्यामुळे पालकवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. मानखुर्द, गोवंडी, शिवाजीनगर परिसरात मुले पळवणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याच्या संशयातून अनेकांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. मात्र , जमावाने मारहाण केलेल्यांपैकी प्रत्यक्षात कुणीही मुले पळवणारे नव्हते.
हेही वाचा - मुले पळवण्याच्या संशयातून जमावाची महिलेस मारहाण; मानखुर्द मंडळ परिसरातील घटना
शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी असाच प्रकार घडला होता. बैगन वाडी येथेही एका महिलेला मुले पळवणारी महिला म्हणून पकडण्यात आले होते. पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतले. तपास केला केला असता कुणाचेही मुलं चोरीला गेल्याची तक्रार आलेली नव्हती. सदर घटनेचा तपास पोलीस करत आहेत. मात्र, केवळ अफवांवर विश्वास ठेवून कुणालाही मारहाण करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.