मुंबई - टीआरपी घोटाळ्यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून आणखीन सहा जणांना समन्स जारी करण्यात आले असून या सहा जणांची गुन्हे शाखेकडून चौकशी केली जाणार आहे. या सहा जणांमध्ये एका वाहिनीच्या चार वरिष्ठ पदावरील व्यक्तींचा समावेश असून 'हंसा रिसर्च' ग्रुपच्या दोघांचा समावेश असल्याचे गुन्हे शाखेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सीईओ विकास खानचंदानी, हर्ष भंडारी, प्रिया मुखर्जी आणि डिस्ट्रीब्यूशन हेड घनशाम सिंह यांना पुन्हा गुन्हे शाखेकडून समन्स बजावण्यात आले आहेत. घनशाम सिंह यांना आज चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, ते आले नसल्याने मुंबई पोलिसांनी पुन्हा त्यांना समन्स बजावले आहे. हंसा ग्रुपच्या दोघांना समन्स पाठवण्यात आले असून त्यांची चौकशी केली जाणार आहे. शशी सेना, सॅम बलसारा यांची गुन्हे शाखेकडून अद्यापही चौकशी सुरू आहे.
हेही वाचा - हार्वर्ड बिझनेस स्कूलची सूत्रे भारतीयाच्या हातात! श्रीकांत दातार होणार हावर्डचे नवे डीन
संबंधित वाहिनीचे मुख्य वित्त अधिकारी एस. सुंदरम आणि घनशाम सिंह हे दोघेही मुंबई पोलिसांकडे टीआरपी घोटाळ्या संदर्भात चौकशी साठी गैरहजर राहिले. दोघांनी पत्र पाठवून ते मुंबई बाहेर असल्याचे कळविले. या बरोबरच याच संदर्भात सर्वोच्च न्यायालयात कलम 32 नुसार याचिका दाखल असल्याने उपस्थित राहता येणार नसल्याचे मुंबई पोलिसांना पत्राद्वारे कळविले.