मुंबई- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यातच नवी दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझ मधील धार्मिक कार्यक्रमातून झालेल्या कोरोनाच्या प्रसारामुळे देशभरात खळबळ माजली आहे. या कार्यक्रमात सहभामी झालेल्या राज्यातील 50 ते 60 जण अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा मोबाईलही बंद आहे. त्यामुळे त्या व्यक्तींनी पोलीस ठाण्यात हजर होऊन स्वतःची वैद्यकीय चाचणी करुन घ्यावी, असे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले होते. त्यातील 5 जणांना मुंबईत हेरण्यात आले असून त्यांना क्वारंटाईन करुन त्यांची चाचणी करण्यात आली आहे.
हेही वाचा- बारामतीतील 'त्या' कोरोनाबाधित व्यक्तीच्या दोन्ही नाती कोरोनाग्रस्त; शहरात एकूण संख्या 6वर
हे 5 जण मुंबईतील धारावी परिसरात स्वतःचा मोबाईल फोन बंद करुन लपले होते. मुंबई पोलिसांच्या स्पेशल ब्रँचने त्यांना शोधून काढले आहे. मुंबई शहरात आतापर्यंत 28 तबलिगींना कोरोनाची लागण झाली आहे. यात 6 विदेशी नागरिकांचा समावेश आहे.
दरम्यान, मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात दिल्ली निझामुद्दीन येथे मरकझच्या कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या तब्बल 150 जणांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यामध्ये सांताक्रुज, बांद्रा व धारावी सारख्या परिसरात वावरणाऱ्या तबलिगींच्या विरोधात संसर्ग रोग पसरवून स्वतःबद्दल माहिती लपविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या 150 जणांना मुंबई महानगर पालिकेकडून हेरण्यात आले होते.