मुंबई Drugs Seized : मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यानं धडक मोहीम राबवत मोठी कामगिरी केली आहे. पोलिसांनी दोन नायजेरियन व्यक्तींकडून तब्बल 9 कोटी रुपयांचं कोकेन जप्त केलं. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी छापा टाकला : साकीनाका पोलिसांना 6 जानेवारीच्या पहाटे हंसा इंडस्ट्रीज या औद्योगिक वसाहतीच्या प्रवेशद्वाराजवळ काही संशयास्पद व्यक्ती दिसून आल्या. यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला आणि दोन इसमांना ताब्यात घेतलं. पोलिसांना त्यांच्याकडे अमली पदार्थ मिळाले, ज्याची किंमत जवळपास 9 कोटी रुपये आहे. चौकशी केली असता हे व्यक्ती नायजेरियन नागरिक असल्याचं समोर आलं.
एकूण 88 कॅप्सूल्स सापडल्या : पोलिसांनी या दोन्ही व्यक्तींची झडती घेतली, तेव्हा त्यांच्याकडे 880 ग्रॅम वजनाच्या अमली पदार्थाच्या कॅप्सूल आढळून आल्या. या कॅप्सूलमध्ये कोकेन होतं. अधिक झडती घेतली असता, त्यांच्याकडे पिवळ्या रंगाच्या अनेक कॅप्सूल्स आढळल्या. या कॅप्सूलची एकूण संख्या 88 एवढी होती. या सर्व कॅप्सूल्समध्ये कोकेन होतं. याची एकूण किंमत अंदाजे 9 कोटी रुपये आहे.
यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई : साकीनाका पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरी संदर्भात मुंबई परिमंडळ 10 चे पोलीस उप आयुक्त दत्ता नलावडे यांनी अधिक माहिती दिली. "नायजेरियन व्यक्तींना साकीनाका पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सापळा रचून पकडलं. त्यांच्याकडून एकूण 9 कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर तसेच पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली", अशी माहिती पोलीस उप आयुक्त दत्ता नलावडे यांनी दिली आहे.
हे वाचलंत का :