मुंबई : मुंबई पोलीस सहआयुक्तांना उशिरा रात्री १ वाजून ११ मिनिटांनी एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. सोलापुरातील मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने यांच्या मोबाईल क्रमांकाचा तांत्रिक हेराफेरी करून वापर करण्यात आला, अशी माहिती समोर आली आहे. माने यांच्या सेम मोबाईल क्रमांकावरून मुंबई पोलीस दलातील वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांना हा बॉम्बस्फोट होणार असल्याचा कॉल आला. त्यानंतर मुंबई पोलीस दलात एकच खळबळ उडाली.
आमदारांच्या मोबाईल नंबरचा गैरवापर : आमदार यशवंत माने यांच्या मोबाईल क्रमांकाचा आधार घेऊन तांत्रिक हेराफेरी करून हिंदी भाषिक अज्ञात व्यक्तीने सहपोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांना रात्री १ वाजून ११ मिनिटांनी केला. मीरा-भाईदरमध्ये बॉम्बस्फोट होणार आहे, असे त्याने सांगितले. तसेच तेथे घटनास्थळी तातडीने पोलीस पाठवण्यास सांगितले. सहपोलीस आयुक्तांनी त्याला अधिक विचारणा केली असता त्याने अपशब्द वापरून फोन कट केला. सहपोलीस आयुक्तांनी ही माहिती मुंबई पोलीस नियंत्रणाला दिली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ मीरा भाईंदर पोलीस नियंत्रणेला माहिती दिली.
घातपात घडवून आणण्याच्या धमक्या : मीरा भाईंदर पोलीस आणि मुंबई पोलीस हे दोन्ही याप्रकरणी तपास करत आहेत. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना देखील माहिती देण्यात आली असून मुंबई गुन्हे शाखा आरोपीचा माग काढत असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईत घातपात घडवून आणण्याच्या धमक्या देणारे फेक कॉल अनेकदा प्राप्त झाले आहेत.
अपशब्द वापरून फोन कट : वरळी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे अज्ञात कॉलरला शोधण्याचे तपासकार्य देखील पोलिसांनी जलद गतीने सुरू केले होते. मुंबई पोलीस दलातील पोलीस सहआयुक्तांना रात्री 1.11 वाजता उशिरा एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्याने स्वत:चे नाव यशवंत माने असल्याचे सांगितले. त्याशिवाय पुण्याचे गुगल ऑफिस उडवण्याच्या धमकीचा कॉल मुंबईतील बीकेसी येथे असलेल्या गुगल ऑफिसमध्ये आला होता.
गुगलचे ऑफिस उडवण्याची धमकी : पुण्यातील गुगल ऑफिस उडवून देऊ, असा धमकीचा निनावी कॉल करण्यात आला होता. या कॉलनंतर बॉम्ब शोधक आणि नाशक बिडीडीएस पथकाकडून रविवारी रात्री संपूर्ण बिल्डिंगची तपासणी करण्यात आली. यावेळी कुठली ही वस्तू संशयास्पद आढळून आली नाही. पोलीस अधिकारी आणि बीडीडीएस पथकाकडून संपूर्ण इमारतीची पाहणी करण्यात आली. ज्या व्यक्तीने धमकीचा फोन केला होता. त्याला आता बीकेसी पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची प्रथामिक माहिती समोर आली आहे. बीकेसी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या कॉलरने सांगितले की, त्याचे नाव पनयम शिवानंद आहे आणि तो हैदराबादचा आहे. चौकशीत काहीही संशयास्पद आढळले नाही. कॉलरला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे बीकेसी पोलिसांनी सांगितले.
दहशतवादी हल्ल्याची धमकी : मुंबईवर अतिरेकी हल्ला करण्याची धमकी काही दिवसांपूर्वी ( दि. 3 शुक्रवार) रोजी ट्विटरवरून देण्यात आली होती. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस प्रशासनाकडून महत्वाच्या ठीकाणी सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. तसेच पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले होते. याप्रकरणी नंतर एक मोठा खुलासा समोर आला. रशियाहून गोव्याला येणाऱ्या प्रवाशाने फ्लाइटमध्ये फेक मेल आयडीवरून ट्विटर करत बॉम्ब असल्याची अफवा पसरवली होती. स्वतःची ओळख तालिबानी असल्याची केली होती. तालिबान संघटनेचा नेता सिराजुद्दीन हक्कानीच्या आदेशानुसार दहशदवादी हल्ला करण्यात येणार असल्याचे म्हटले होते. तो मेल आयडी तयार करण्यासाठी वापरण्यात आलेला क्रमांक पाकिस्तानमधील कराची येथून ऑपरेट करण्यात अल्याचे तपासत समोर आले आहे.
हेही वाचा : Mumbai Police : मीरा-भाईदरमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याचा सहपोलीस आयुक्तांना फोन, पोलिसांकडून तपास सुरू