मुंबई - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून कोरोनाविरोधात लढण्यासाठी मैदानात खाकीतले हिरो उतरले आहेत. कोरोनाविरोधात लढताना पोलिसांची महत्वाची भूमिका ठरत आहे. मुंबई पोलीस खात्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या एका उच्चपदस्थ आयपीएस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. संबधित अधिकाऱ्याचे कार्यालय सील करण्यात आले असून त्यांच्या संपर्कात आलेल्याचा शोध सुरू आहे.
संबधित अधिकाऱ्याची काही दिवसांपूर्वीच राज्यातील काही महत्वाच्या मंत्र्यासोबत बैठक झाली होती. गुरुवारी संध्याकाळी या आयपीएस पोलीस अधिकाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सबंधित बैठकीत उपस्थित असलेल्या काही मंत्री ,व इतर कर्मचाऱ्यांची थर्मल चाचणी घेतली असता, सदर मंत्री व इतर व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या या आयपीएस अधिकाऱ्याला कोरोनाची कुठलंही लक्षण नसल्याचे सूत्रांकडून कळत आहे. सध्या या अधिकाऱ्याच्या कार्यालयातील संपर्कांत आलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे.