मुंबई- २०२० हे वर्ष कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी ओळखले जात असताना मुंबई शहर हे अमली पदार्थ तस्करीच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईसाठीसुद्धा ओळखले जात आहे. लॉकडाऊन काळात गेल्या काही महिन्यांपासून बहुतांश व्यवहार ठप्प पडले असताना अमली पदार्थ तस्करीचा बाजार मोठ्या प्रमाणावर फुलत होता. या विरोधात मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत २ हजार ५८९ अरोपींना अटक केली आहे.
लॉकडाऊन काळात मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबई शहरात हेरॉईन, चरस, कोकेन, एमडी, एलसीडी डॉट पेपर आणि इतर प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. जानेवारी २०२० ते ऑगस्ट २०२० पर्यंत आर्थिक राजधानी मुंबईत एकूण २ हजार ४६९ गुन्हे दाखल करण्यात आले असून यात २ हजार ५८९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तब्बल २५९ किलो वजनाचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. त्याची आंतराष्ट्रीय बाजारातील किंमत ही तब्बल १३ कोटी ५४ लाख १६ हजार एवढी आहे.
मुंबईत पोलिसांनी केलेली कारवाई पुढील प्रमाणे:
१) हेरॉईन- जानेवारी २०२० ते ऑगस्ट २०२० पर्यंत मुंबईत हेरॉईन या अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी ६ गुन्हे दाखल झाले असून यात ८ जणांना अटक करण्यात आली आहे. यात १२ कोटी १२ लाख ५१ हजारांचे ६ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे.
२) चरस- जानेवारी २०२० ते ऑगस्ट २०२० पर्यंत मुंबईत चरस या अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी ७ गुन्हे दाखल झाले असून यात ९ जणांना अटक करण्यात आली आहे. यात ३१ लाख ५६ हजारांचे ७ किलो चरस जप्त करण्यात आले आहे.
३) कोकेन- जानेवारी २०२० ते ऑगस्ट २०२० पर्यंत मुंबईत कोकेन या अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले असून यात ३ जणांना अटक करण्यात आली आहे. यात ९ लाख २५ हजारांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे.
४) गांजा- जानेवारी २०२० ते ऑगस्ट २०२० पर्यंत मुंबईत गांजा या अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी ९१ गुन्हे दाखल झाले असून यात ९५ जणांना अटक करण्यात आली आहे. यात ४९ लाख ६१ हजारांचे २४५ किलो गांजा जप्त करण्यात आले आहे.
५) एम.डी- जानेवारी २०२० ते ऑगस्ट २०२० पर्यंत मुंबईत एम.डी अमली पदार्थाच्या तस्करी प्रकरणी ३६ गुन्हे दाखल असून यात ४० जणांना अटक करण्यात आली आहे. यात ३८ लाख ४० हजारांचे एमडी जप्त करण्यात आले आहे.
६) इतर प्रकरणे- अमली पदार्थाच्या इतर प्रकरणात अमली पदार्थ विरोधी पथकाने १८ गुन्हे दाखल केले असून यात २० जणांना अटक करण्यात आली आहे. तर, अमली पदार्थ सेवन करण्याच्या प्रकरणात आतापर्यंत २ हजार ३०७ गुन्हे नोंदविण्यात आले असून, या प्रकरणी २ हजार ४१४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा- भांडूपमध्ये कृत्रिम तलाव कोसळला, स्थानिकांचे आंदोलन