मुंबई - मुंबईमध्ये 8 वर्षांपेक्षा अधिक काळ काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या थांबल्या आहेत. कोरोना प्रादुर्भाव, मनपा निवडणूक आणि सण समारंभ या पार्श्वभूमीवर बदल्यांचे आदेश पुढील 6 महिन्यांसाठी थांबवण्यात आले आहेत. मुंबईतल्या तब्बल 727 अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार होत्या. त्यासंदर्भात यादी देखील तयार करण्यात आली होती.
माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणानंतर पोलीस खाते बदनाम झाल्याचे बोलले जात होते. त्या दृष्टीने 8 वर्षांपेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी असणाऱ्या अधिकाऱ्यांची आंतरजिल्हा बदली करण्यात येणार होती. सध्या आरोग्य आणि सामाजिक स्थिती पाहता या बदल्या थांबवण्यात आल्या आहेत.
कोणत्या पदावरील अधिकाऱ्यांची होणार होती बदली?
एखाद्या शहरामध्ये 8 वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार होत्या. या बदल्यांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावरील अधिकाऱ्यांचा समावेश होता. या बदल्यांमध्ये मुंबई पोलीस दलातील 727 अधिकाऱ्यांचा समावेश होता. महत्त्वाचे म्हणजे या पोलीस अधिकाऱ्यांना मुंबई बाहेरील तीन जागा निवडण्याची सवलत देखील देण्यात आली होती.
बदल्यांची कारणं काय?
मागच्या काही दिवसांमध्ये मुंबई पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचे बोलले जात होते. सचिन वाझे प्रकरणामुळे ही प्रतिमा डागाळली होती. पोलीस विभागातील भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी ही पावलं उचलली गेली. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया इमारतीबाहेरील कार स्फोटक प्रकरण, मनसुख हिरेन हत्या प्रकरण, त्याचबरोबर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा आरोप आणि त्यात काही पोलीस अधिकाऱ्यांची नावं आल्याने पोलीस विभागातील भ्रष्टाचार पाहाता बदल्यांचे निर्णय घेतले होते.
हेही वाचा - राज्याचा कृषी सुधारणा कायदा पावसाळी अधिवेशनात मंजुर होण्याबद्दल शरद पवार साशंक