मुंबई - नकली नोटांचा व्यापाराप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका पटकथाकाराला (स्क्रिप्ट रायटर) अटक केली आहे. देवकुमार पटेल असे या स्क्रिप्टरायटरचे नाव असून, तो टीव्ही सिरियलच्या स्क्रिप्ट लिहायचा. आरोपी देवकुमारकडून पोलिसांनी पावणे सहा लाख रूपयांच्या नकली नोटा जप्त केल्या आहेत.
देवकुमार पटेल हा स्वत: स्क्रिप्ट रायटर असून या आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ९ यांनी ५ लाख ७८ हजार रूपयांच्या बनावट नोटांसह अटक केली आहे. या बनावट नोटांच्या मदतीने देवकुमार स्वत:ची सिरीयल काढण्याच्या तयारीत असल्याचा संशय गुन्हे शाखेला आहे.
देवकुमार पटेलला मागील काही वर्षांपासून स्क्रिप्ट रायटींगमध्ये यश मिळत नव्हते. त्यामुळे त्याच्यावर कर्ज झाले होते. हे कर्ज फेडण्यासाठी आणि स्वतःचीच टिवी सिरीयल बनविण्यासाठी वर्षभरापासून पटेल नोटा छापत होता. अखेर त्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली आहे. हा आरोपी चक्क ५० टक्के किंमतीत बनावट नोटांचा व्यापार करत होता. शुक्रवारी आरोपी देवकुमारला न्यायालयात हजर केले असता, त्याला २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी किती जणांचा समावेश आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.