भुवनेश्वर Crime News : मुंबई पोलिसांनी भुवनेश्वरमधून दोघांना सायबर फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे. या दोघांनी बनावट वेबसाइटद्वारे लाखो रुपयांची फसवणूक केली होती. राजेंद्र मल्लिक (२४) आणि सचिन दिग्गल (२६) अशी आरोपींची नावं आहेत.
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या नावानं बनावट वेबसाइट : फसवणूक करणार्यांनी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या नावानं बनावट वेबसाइट तयार केली होती. त्यांनी अर्ज प्रक्रिया शुल्कापोटी प्रत्येकी १००० रुपये देण्याचं सांगून नोकरी शोधणार्यांची फसवणूक केली. अनेक दिवस कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं, अर्जदारांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि त्यांनी मुंबई पोर्ट ट्रस्ट प्राधिकरणाशी संपर्क साधला. त्यांनी १० ऑक्टोबर रोजी या मोठ्या घोटाळ्याच्या संदर्भात MRA मार्ग पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
भुवनेश्वरमधील महिलांच्या खात्यात पैसै ट्रान्सफर : पोलीस तपासात, पीडितांनी ज्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले ते भुवनेश्वरमधील काही महिलांचे असल्याचं उघड झालं. मागच्या आठवड्यात मुंबई पोलिसांचं एक पथक तेथे गेलं आणि त्यांनी त्या महिलांशी संपर्क साधला. त्यांनी खात्यांबद्दल कोणतीही माहिती असल्याचं नाकारलं. मात्र, त्यांनी तपास पथकाला दोन व्यक्तींनी त्यांचं आधार कार्ड घेतल्याचं सांगितलं.
मोठा मुद्देमाल जप्त : या महिलांच्या जबाबाच्या आधारे, मुंबई पोलिसांनी मल्लिक आणि दिग्गल यांना ताब्यात घेतलं. त्यांनी चौकशीदरम्यान खोटी खाती उघडण्यासाठी मोठं कमिशन घेतल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून ३७ मोबाईल फोन, १२ पॅनकार्ड, ३८ एटीएम कार्ड, २५ सिमकार्ड आणि एक लॅपटॉप एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली. त्यांना अधिक चौकशीसाठी ट्रान्झिट रिमांडवर नेलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा :