मुंबई- मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाचा मंगळवारी कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याच्यावर कांदिवली येथील पालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरू होते. पालिकेच्या सेवेततील सातव्या सुरक्षा रक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जागतिक दर्जाचे शहर असलेली मुंबई कोरोनाची हॉटस्पॉट झाली आहे. मुंबईत रोज कोरोनाचे हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत असल्याने मुंबई रेड झोनमध्ये आहे. मुंबईतील पालिका, राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पालिकेच्या केईएम रुग्णालयात काम करणारे बक्कल क्रमांक 4732 हे सुरक्षा रक्षक 11 जूनला पॉझिटिव्ह आले होते. त्यांना कांदिवली येथील पालिकेच्या डॉ.आंबेडकर शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा 16 जूनला मृत्यू झाला.
मुंबई महापालिकेची कार्यालये, मुख्यालय, पाणी पुरवठा करणारी धरणे, पाणी शुद्धीकरण प्रकल्प, रुग्णालये आदी ठिकाणी सुरक्षा रक्षकांना तैनात केले जाते. पालिकेच्या सेवेत 1500 सुरक्षा रक्षक आहेत. त्यापैकी 114 सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 36 सुरक्षा रक्षक रुग्णालयात उपचार घेत आहेत. 45 सुरक्षा कर्मचारी घरात तसेच क्वारंटाईन सेंटरमध्ये क्वारंटाईन आहेत. 26 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 7 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.