मुंबई - ज्या विभागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे, ते भाग यापूर्वी सरसकटपणे 'कंटेनमेंट झोन' म्हणजेच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात येत होते. या भागात पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांची नेमणूक लागत होती. या कर्मचाऱ्यांचे नियोजन करण्यात अडचणी येत असल्याने 'कंटेनमेंट झोन' ची व्याख्या बदलण्यात आली आहे. कंटेनमेंट झोन' व्यतिरिक्त 'सीलबंद इमारती' ही आणखी एक वर्गवारी तयार करण्यात आली असून, लोकसहभाग वाढवण्यावर भर देण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
ज्या विभागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. ते भाग यापूर्वी सरसकटपणे 'कंटेनमेंट झोन' म्हणून घोषीत करण्यात येत होते. मात्र, एकाच परिसरातील एकापेक्षा अधिक इमारतींना किंवा भागांना 'कंटेनमेंट झोन' म्हणून घोषीत केल्यामुळे पोलीस व महापालिकेच्या स्तरावर मनुष्यबळाचे नीट व्यवस्थापन करण्यात अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन, महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी दिलेल्या निर्देशांनुसार कंटेनमेंट झोन' व्यतिरिक्त 'सीलबंद इमारती' ही आणखी एक वर्गवारी आणि 'कंटेनमेंट झोन'ची पुनर्रचनाही करण्यात आली आहे. सीलबंद इमारती आणि कंटेनमेंट झोन भागात प्रभावीपणे लक्ष पुरवण्यासाठी लोकसहभाग वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. सीलबंद इमारतींबाबतची कार्यवाही सोसायटी'च्या व्यवस्थापकीय समितीच्या किंवा सोसायटीने निश्चित केलेल्या सदस्यांच्या समितीच्या पुढाकाराने केली जाणार आहे. पालिका प्रशासनाचे याला सहकार्य मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सीलबंद इमारती --
एखाद्या परिसरातील एका इमारतीमध्ये एक बाधित रुग्ण किंवा काही संशयीत रुग्ण आढळून आले असल्यास अशा इमारतीला किंवा त्या इमारतीच्या भागाला 'सीलबंद' म्हणून घोषीत करण्यात येईल. हे करताना बाधित (पॉझिटिव्ह) रुग्ण राहत असलेल्या सदनिकेची व इमारतीची परिस्थिती लक्षात घेऊन सदर इमारत किंवा इमारतीचा काही भाग 'सीलबंद' म्हणून घोषीत करण्यात येईल. अशा इमारतीच्या व्यवस्थापकीय समितीस याची माहिती देण्यात येईल. सोसायटीतील इतर व्यक्तींना बाधा होऊ नये, यासाठी खबरदारीच्या उपाययोजनांबाबत माहिती व मार्गदर्शन महापालिकेच्या आरोग्य खात्याद्वारे देण्यात येईल.
सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी --
कोरोना रुग्ण आढळून आलेल्या सीलबंद इमारतीबाबत नियुक्त करण्यात आलेल्या सोसायटीच्या समितीद्वारे स्थानिक किराणा दुकानदार, भाजीविक्रेते, मेडिकल दुकान इत्यादींशी संपर्क साधून सोसायटीच्या गरजांनुसार वस्तूंची वा सामानाची मागणी नोंदवली जाणार आहे. 'ऑर्डर' दिलेल्या सामानाची किंवा वस्तूंची 'डिलिव्हरी' ही सोसायटीच्या 'एन्ट्री गेट'वर दुकानदारांद्वारे वा विक्रेत्यांद्वारे दिली जाणार आहे. त्यानंतर ऑर्डरनुसार सोसायटी सदस्याच्या दरवाजापर्यंत वस्तूची डिलिव्हरी करण्याची व्यवस्थाही सोसायटीच्या समितीद्वारे केली जाणार आहे. सोसायटीत कोरोना लक्षणे आढळून आल्यास समिती सदस्यांनी त्याची माहिती पालिकेला कळवण्याची दक्षता घ्यायची आहे.
कंटेनमेंट झोनची संख्या -
कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी मुंबई महापालिका विविध उपाययोजना राबवत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने मुंबईतील कंटेनमेंट झोनची पुनर्रचना व सीलबंद इमारती अशी वर्गवारी करण्यात आली आहे. मुंबईत २ हजार ८०१ कंटेनमेंट झोन होते. नव्या व्याख्येनुसार मुंबईत ६६१ कंटेनमेंट झोन घोषीत करण्यात आले आहेत. तसेच मुंबईत सध्या १ हजार ११० इमारती सिलबंद म्हणून घोषीत करण्यात आल्या आहेत.