मुंबई- पावसाळ्यात शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. पाणी साचू नये म्हणून पावसाळ्यापूर्वी नालेसफाई तसेच नद्यांची सफाई केली जाते. या कामांची पहाणी आज पालिका आयुक्त इकबाल चहल यांनी केली. तसेच नालेसफाईची कामे पावसाळ्यापूर्वी निर्धारित वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश आयुक्तांनी दिले.
मुंबईत पावसाळ्यात सखल भागात पाणी साचत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने रेल्वे सेवाही बंद पडते. याचा परिणाम प्रवासी आणि नागरिकांवर होतो. वेळप्रसंगी मुंबई ठप्प होते. यामुळे पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. नाल्यांमधील गाळ मुंबईबाहेर डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो. तसेच, मुंबईमधील पोयसर, मिठी, पवई आदी नद्यांची सफाई देखील यावेळी करण्यात येते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशभरात लॉकडाऊन असल्याने नालेसफाईची कामे उशिरा सुरू झाली. ही कामे पावसाळ्यापूर्वी म्हणजेच मे महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणे अपेक्षित असते. त्यामुळे, पालिका आयुक्त चहल यांनी शहरातील नालेसफाई तसेच नद्यांच्या सफाईच्या कामांची पहाणी केली. यावेळी चहल यांनी सफाईची कामे वेळेवर पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
हेही वाचा- दिलासादायक.. राज्यात २५ हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू, सहा लाख कामगार रुजू - उद्योगमंत्री