मुंबई- वादग्रस्त महापौर विश्वनाथ महाडेश्वर पुन्हा एकदा विवादात अडकले आहेत. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यात समस्या जाणून घेण्यासाठी गेलेल्या महापौरांनीच गऱ्हाणे मांडणाऱ्या मुलीचे चक्क हात पिरगळले व तिला धमकावले आहे.
'ए दादागिरी करू नकोस, तू ओळखत नाही मला" असे बोल मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी गऱ्हाणे मांडणाऱ्या मुलीला सुनावले आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात सांताक्रूझमधील पटेल नगर येथे विजेचा धक्का लागून आई-मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. पीडित परिवाराचे सांत्वन करण्यासाठी महापौर महाडेश्वर सोमवारी पटेल नगरमध्ये आले होते.
यावेळी संतप्त रहिवाश्यांनी महाडेश्वर यांना घेराव घालून "तुम्ही शब्द दिल्या प्रमाणे काल का आले नाही. घटनेच्या दुसऱ्या दिवशी का आलात" असा सवाल केला. रहिवाशांच्या रोषामुळे वैतागलेल्या महापौरांचा संयम सुटला आणि त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या मुलीचाच हात पकडून पिरगळला व तिला धमकावले. यामुळे संतापलेल्या रहिवाशांचे उग्र रूप बघून महापौरांनी परिसरातून काढता पाय घेतला. मात्र हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने महापौर महाडेश्वर पुन्हा एकदा चांगलेच गोत्यात आले आहेत.
मात्र या महिला मनसेच्या होत्या. त्यांनी हाताची साखळी करून आम्हाला अंत्यदर्शन करण्यासाठी रोखले. तेव्हा हात बाजूला करून आम्ही तिथे गेलो. मी हात मुरगळलाच नाही. आम्ही असे कोणतेही चुकीचे काम केले नसल्याचे महापौरांनी स्पष्टीकरण दिले आहे. या आधीसुद्धा मुंबईत पाणी तुंबूनही पाणी तुंबलेच नसल्याचे अजब स्पष्टीकरण महापौरांनी दिले होते.